Chitrakoot Crime News: NEET विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चित्रकूटमध्ये ३७४ CCTV, ६ हजार कॉल्स तपासले, मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी
esakal July 28, 2026 10:45 PM

उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात देवांगना घाटी हवाई पट्टीजवळ २० वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या गंभीर प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत छडा लावला. पोलिसांनी ३७४ सीसीटीव्ही फुटेज आणि सुमारे ६ हजार कॉल्सचे विश्लेषण करून मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ भोले पटेल याला शोधून काढले. मडफा जंगलाजवळ झालेल्या चकमकीत आरोपीच्या पायाला गोळी लागली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

घटनेच्या वेळी तरुणीसोबत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला आरोपींनी बंधक बनवून ठेवले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रयागराज क्षेत्राचे एडीजी ज्योती नारायण आणि डीआयजी राजेश एस यांच्या निर्देशानुसार चित्रकूटचे पोलीस अधीक्षक अरुण कुमार सिंह यांनी पाच विशेष पथके तयार केली होती.

३७४ CCTV आणि ६ हजार कॉल्समधून आरोपींचा माग

घटनेनंतर पोलिसांसमोर आरोपींची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. त्यासाठी पोलिसांनी सलग ७२ तास तपास केला. जिल्ह्यातील १८ प्रमुख ठिकाणांवरील ३७४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्याचबरोबर सुमारे ६ हजार मोबाईल कॉल्सचे विश्लेषण करण्यात आले.

या तपासादरम्यान पोलिसांनी ५८ संशयितांची चौकशी केली. त्यातून जितेंद्र उर्फ भोले पटेल याच्यापर्यंत पोलिस पोहोचले. त्याच्यावर ₹५० हजारांचे बक्षीस जाहीर असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

मडफा जंगलात पोलिसांची आरोपींशी चकमक

शनिवारी आरोपींचे लोकेशन मडफा जंगलाजवळ मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसराची घेराबंदी केली. पोलिसांना पाहताच आरोपींनी गोळीबार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या गोळीबारात पोलीस कॉन्स्टेबल राघवेंद्र यांच्या हाताला गोळी लागली.

यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादरम्यान जितेंद्र उर्फ भोले पटेल याच्या गुडघ्याजवळ गोळी लागली. जखमी अवस्थेत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल राघवेंद्र आणि आरोपी जितेंद्र या दोघांवरही शिवरामपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील प्रवीण पटेल आणि विवेक पटेल हे दोघे जंगलाचा फायदा घेत पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.

महिला आयोगाचीही गंभीर दखल

या घटनेची उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या प्रतिभा कुशवाह यांनी बहिलपूरवा पोलीस ठाण्याकडून प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.

पर्यटन आणि जंगल परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोक्याची सूचना देणारे फलक लावणे, तसेच अशा ठिकाणी दारू आणि गुटख्याच्या विक्रीवर बंदी घालणे, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध, तपासाची पुढील दिशा आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.