Sanju Samson: विराट कोहलीचा सल्ला मानला, पण जेमतेम दीड वर्षच पाळता आला; संजू सॅमसनने सांगितला खास किस्सा, नेमक काय म्हणाला संजू?
esakal July 28, 2026 11:45 PM

Sanju Samson Reveals Virat Kohli's Fitness Advice: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा फक्त त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळेच नाही, तर फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळेही जगभरातील क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्थान मानला जातो.

मैदानावर तासन्तास खेळल्यानंतरही त्याची फिटनेस कायम तशीच दिसते. त्यामुळे अनेक युवा खेळाडू त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतात. आता भारतीय यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने विराटसोबतचा एक खास अनुभव शेअर केला आहे.

जिओस्टारशी बोलताना संजूने सांगितलं की, भारतीय संघाच्या कॅम्पदरम्यान त्याला विराटसोबत जिममध्ये सराव करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्याने विराटकडून फिटनेस आणि करिअरबद्दल बऱ्याच गोष्टी शिकल्या.

IND vs ENG: "१२ हजार धावा अन् लोकांची फौज..." अश्विनने सांगितलं रोहित-विराटला संघातून न काढण्याचं खरं कारण

संजू म्हणाला, "विराट भाई जिममध्ये ज्या पद्धतीने मेहनत घेतात, ते पाहूनच प्रेरणा मिळते. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मला त्याला एकच प्रश्न विचारायचा होता की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वर्ष टिकायचं असेल तर काय करावं?"

त्यावर विराटने त्याला फक्त व्यायामाचाच नाही, तर खाण्यापिण्यापासून ते शरीराची रिकव्हरी कशी करायची, याचाही सल्ला दिला. कोणते पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायदा होतो, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात आणि प्रत्येक दिवसाची शिस्त किती महत्त्वाची आहे, हेही त्याने समजावून सांगितलं. विराटने त्यावेळी संजूला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. तो म्हणाला, "पुढची दहा वर्षं हीच शिस्त कायम ठेवलीस, तर तुझं करिअर खूप मोठं होईल."

हा सल्ला ऐकल्यानंतर संजूने स्वतःची दिनचर्या बदलली. त्याने जवळपास दीड वर्ष विराटने सांगितलेले सगळे नियम पाळले. मात्र त्यानंतर तेच रूटीन कायम ठेवणं त्याला शक्य झालं नाही. याबद्दल बोलताना संजूने प्रामाणिकपणे कबुली दिली."मी जवळपास दीड वर्ष विराट भाईंचं सगळं फॉलो केलं. पण त्यानंतर तीच शिस्त कायम ठेवणं माझ्यासाठी खूप कठीण झालं. विराट ज्या पद्धतीने स्वतःला फिट ठेवतात, ते खरंच प्रत्येकासाठी सोपं नाही," असं तो म्हणाला.

संजूने पुढे आपल्या करिअरबद्दलही मनमोकळेपणाने मत व्यक्त केलं. भारतीय संघात जागेसाठी कायम स्पर्धा असते. ईशान किशनला संधी मिळाल्यानंतर आपणही खूप विचार केला, पण आता दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःचा खेळ सुधारण्यावर भर देतो, असं त्याने सांगितलं.

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

"आता मी फक्त माझ्या खेळावर लक्ष देतो. २०२८ च्या टी-२० विश्वचषकासाठी संधी मिळाली तर नक्की आनंद होईल. पण मिळाली नाही तरी मी माझ्या आतापर्यंतच्या क्रिकेट प्रवासाबद्दल समाधानी आहे. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायला मिळालं," असंही संजू म्हणाला.

विराट कोहलीने गेल्या अनेक वर्षांत आपल्या फिटनेसच्या जोरावर जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये स्थान कायम राखलं आहे. त्याची जीवनशैली आजही अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देते. मात्र संजू सॅमसनच्या या कबुलीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, विराटसारखी शिस्त आणि फिटनेसचं रूटीन पाहायला जितकं सोपं वाटतं, तितकंच ते रोजच्या आयुष्यात पाळणं खूप कठीण असतं. त्यामुळेच विराटची मेहनत आणि समर्पण आजही इतर खेळाडूंसाठी वेगळी ओळख निर्माण करत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.