फुलंब्री : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज पाटील जरांगे पाटील यांनी मराठा सेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक बुधवारी सकाळी ११ वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे होणार असून, फुलंब्री तालुक्यातील सर्व गावांतील मराठा सेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांबाबत पुढील भूमिका, संघटनात्मक बांधणी आणि आगामी आंदोलनाची रणनीती यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. समाजातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पुढील लढ्याची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
बैठकीच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुक्यातील विविध गावांमध्ये तयारीला वेग आला असून, मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि सेवक बैठकीसाठी रवाना होण्याचे नियोजन करत आहेत. अनेक गावांतून वाहनांची व्यवस्था करण्यात येत असून, समाजबांधवांमध्ये बैठकीबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे.
फुलंब्री तालुक्यातील हजारोंच्या संख्येने मराठा बांधव व मराठा सेवक या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. त्यामुळे अंतरवली सराटी येथे होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले असून, आगामी आंदोलनाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवर पुढील भूमिका काय असेल, याबाबत मनोज जरांगे पाटील बैठकीत मार्गदर्शन करणार असल्याने राज्यभरातील कार्यकर्त्यांसह फुलंब्री तालुक्यातील मराठा समाजातही या बैठकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.