एफ-२ वाघिणीचा 'फॅमिली टाइम'; चार बछड्यांनी वेधलं वन्यजीवप्रेमींचे लक्ष, पाहा VIDEO
esakal July 29, 2026 01:45 AM

पवन गवई

नागपूर, ता. २८ : पावसामुळे हिरवाईने नटलेल्या उमरेड-पवनी-कहांडला वन्यजीव अभयारण्यात सध्या वन्यजीवांचे दर्शन वाढले असून, गोठणगाव प्रवेशद्वार परिसरातील तलावावर सोमवारी (ता. २७) सकाळी एक दुर्मीळ आणि मन मोहून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. अभयारण्यातील एफ-२ वाघीण आपल्या चार गोंडस बछड्यांसह तलावाच्या काठावर निवांत विहार करताना दिसली.

सकाळच्या शांत वातावरणात आई वाघीण सतर्कपणे परिसरावर नजर ठेवून होती, तर तिचे चारही बछडे पाण्याच्या काठावर खेळण्यात आणि इकडेतिकडे बागडण्यात रमले होते. काही वेळ ते आईभोवती घुटमळत होते, तर कधी तलावाच्या काठावर उत्सुकतेने परिसर न्याहाळत होते. आईच्या संरक्षणाखाली बछड्यांचा हा मुक्त संचार पाहणे म्हणजे जंगलातील नैसर्गिक जीवनाचा अनोखा अनुभव असल्याची भावना पर्यटकांनी व्यक्त केली. वन्यजीव छायाचित्रकार सचिन ठवकर यांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला असून, त्याचा व्हिडिओ वन्यजीवप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Blue Flag Beaches : गुहागर, लाडघरचा झेंडा जगात फडकणार; ब्ल्यु फ्लॅग दर्जा हा विकासाचा मार्ग; आधी स्वच्छता मग समृद्धी

वन विभागाच्या माहितीनुसार, बछड्यांची निरोगी वाढ आणि त्यांच्यासोबत वाघीणीचा मुक्त वावर ही अभयारण्यातील समृद्ध अधिवासाची सकारात्मक नोंद मानली जाते. अन्नसाखळी, पाण्याचे स्रोत आणि जंगलातील सुरक्षित वातावरण यामुळे या भागात वाघांचे वास्तव्य स्थिर होत असल्याचे चित्र आहे.

गोठणगाव परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी असे दर्शन मोठे आकर्षण ठरत असले, तरी वन विभागाने अभयारण्यातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. वाहनांचा वेग मर्यादित ठेवणे, अनावश्यक आवाज टाळणे आणि वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Powai Lake: मुंबईकरांची धडधड वाढली! तलावातून 7 फूट मगर बाहेर आली; नागरिकांची धावपळ, वन विभागाने अनर्थ टाळला
View this post on Instagram

A post shared by Umred karahandla wildlife sanctuary Official (@umred_karahandla_sanctuary)