Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक
esakal July 29, 2026 02:45 AM

पुणे : शिवाजीनगर परिसरातील एका महिलेस लहान मुलासाठी खेळण्यातील मोटार (टॉय कार) चक्क पावणेचार लाख रुपयांना पडली. ऑनलाइन खरेदीच्या प्रयत्नात या महिलेची सायबर चोरट्यांनी तीन लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने (वय ३२, रा. शिवाजीनगर पोलिस वसाहत, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार २७ जुलै रोजी रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १७ जुलै ते २४ जुलै या कालावधीत घडला. फिर्यादी महिला पतीच्या मोबाईलवर सोशल मीडियावर रिल्स पाहत होती. त्यावेळी त्यांना लहान मुलासाठी टॉय कार विक्रीची जाहिरात दिसली. ही जाहिरात बघत असताना सायबर चोरट्याने महिलेशी ऑनलाइन संपर्क साधून टॉय कार घरपोच पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी यूपीआय स्कॅनरचा फोटो पाठवून सुरुवातीला पाचशे रुपये भरण्यास सांगितले.

फिर्यादी महिलेने सायबर चोरट्याच्या म्हणण्यानुसार पाचशे रुपये ऑनलाइन भरले. परंतु त्यानंतर आरोपीने व्यवहार पूर्ण झालेला नसल्याचे सांगत विविध कारणे पुढे केली. मोटारीची घरपोच डिलिव्हरी, पेमेंट अडकले असे कारण देत वारंवार पैसे भरण्यास भाग पाडले. अशा प्रकारे आरोपीने फिर्यादींकडून तीन लाख ७९ हजार रुपये उकळले. मात्र, टॉय कार न पाठवता आरोपीने संपर्क तोडला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

दरम्यान, सोशल मीडियावरील जाहिरातींवर विश्वास ठेवून अनोळखी व्यक्तींना यूपीआयद्वारे पैसे पाठविण्यापूर्वी विक्रेत्याची खातरजमा करावी. तसेच कोणत्याही व्यवहारासाठी वारंवार पैसे भरण्याची मागणी होत असल्यास तत्काळ सावध व्हावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.