सोलापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव १ ते ९ ऑगस्टपर्यंत साजरा होणार आहे. ९ ऑगस्टला मिरवणूक निघणार आहे. या काळात सार्वजनिक मंडळांनी मंडप टाकताना वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. पावसाचे दिवस असल्याने सर्वांनी ‘महावितरण’कडून अधिकृतपणे वीज कनेक्शन घ्यावे, आवाजाची स्पर्धा न करता मंडळाच्या १५०-२०० कार्यकर्त्यांना ऐकू येईल एवढाच साऊंडचा आवाज ठेवावा, मंडळांनी मिरवणुकीची तयारी एका दिवसात करावी, जेणेकरून सार्वजनिक रस्ता वाहतुकीसाठी त्या दिवशी बंद ठेवता येईल. मिरवणुकीला रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी राहील, असे पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी आज स्पष्ट केले.
मंगळवारी (ता. २८) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्ताने पोलिस आयुक्तालयात शांतता कमिटी व मध्यवर्ती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, प्रीतम यावलकर, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, वृष्टी जैन, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गावरील झाडाच्या फांद्या तोडाव्यात, वायरिंग बाजूला करावी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळ्याजवळील अतिक्रमण काढावे, मिरवणुकीच्या दिवशी पुतळ्याजवळील स्टेजची भरमसाठ संख्या कमी करावी, असे मुद्दे मांडले. तसेच मंडळांना जयंती उत्सवाचा परवाना ऑनलाइनऐवजी ऑफलाइन देण्याची सोय करावी, अशीही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. त्यावर पोलिस आयुक्तांनीही उत्सव व मिरवणुकीवेळी योग्य नियोजन राहील, अशी ग्वाही दिली. जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष साक्षांत लोखंडे, नगरसेवक समाधान आवळे, राकेश भोसेल, ॲड. दयानंद शिंदे, राजू क्षीरसागर, युवराज पवार, रोहन लोंढे, विकास कसबे आदींनी मते मांडली.
माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे म्हणाले....
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नामुळे राज्यभरात वातावरण दुषित होत आहे. समाजातील काही अपप्रवृत्तींकडून जाणिवपूर्वक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, सायबर पोलिसांनाही अलर्ट करावे. यंदाच्या मिरवणुका मोठ्या जल्लोषात पारंपारिक वाद्यांच्या गजरात, आवाजाची मर्यादा पाळून सर्व निघतील, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी दिली. दरम्यान, यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांचे आभार मानत गतवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुकीस रात्री १२ पर्यंत परवानगी द्यावी, अशी विनंती केली. मात्र, माजी मंत्री खंदारे यांनी सध्याचे वातावरण पाहता रात्री १२ वाजेपर्यंत नव्हे, तर रात्री १० वाजेपर्यंत मिरवणुका पार पडतील, असे समाजाच्या वतीने स्पष्ट केले.
डिजिटल लावायला परवानगी पण...
या बैठकीवेळी काही पदाधिकाऱ्यांनी ‘डिजिटल’मुळे शांतता-सुव्यवस्था बिघडू शकते, अशी भीती व्यक्त केली. पण अनेकांनी डिजिटल फलक लावले जातील. त्यासाठी परवानगी द्यावीच, अशी भूमिका मांडली. यावेळी महापालिकेकडून ‘नाे डिजिटल’ झोनची यादी प्रसिद्ध केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी सांगितले.