NEET UG 2026 Leak: नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात एनटीए तज्ज्ञांसह १३ जणांवर सीबीआयचे आरोपपत्र; प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी फुटल्याचे फॉरेन्सिक अहवालातून सिद्ध
esakal July 29, 2026 03:45 AM

पुणे : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'नीट-यूजी २०२६' परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात १३ आरोपींविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्ली येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यातील सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

या गुन्ह्यातील आरोपींमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) विषय तज्ज्ञ, मध्यस्थ आणि नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांचा समावेश आहे. आरोपींची बँक खाती, लॉकर आणि डिमॅट खाती गोठवण्यात आली असून पैशांचा व्यवहार उघडकीस आला आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आणि हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालावरून परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे सिद्ध झाले आहे. पुढील तपास आणि डिजिटल फॉरेन्सिक विश्लेषण अद्याप सुरू असून या प्रकरणातील एकाही दोषाला सोडले जाणार नाही, असा इशारा सीबीआयने दिला आहे.

​सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट परीक्षेत गैरव्यवहार आणि पेपर फुटल्याची तक्रार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने १२ मे रोजी नोंदवली होती. त्यानुसार सीबीआयने तत्काळ गुन्हा दाखल करून ७२ अधिकारी आणि ८ सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष पथके तयार केली. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, दिल्लीसह देशातील ९२ ठिकाणी छापे टाकून संगणक, मोबाईल आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले होते. तपासात रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांचे प्रश्न परीक्षेपूर्वीच फुटल्याचे उघडकीस आले होते. 

तपासादरम्यान सीबीआयने पेपरफुटीचा मुख्य स्रोत आणि परीक्षार्थींपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवणारी संपूर्ण साखळी उघडकीस आणली आहे. या प्रकरणात १३ मे २०२६ रोजी पहिली अटक करण्यात आली होती.

आरोपींची नावे :

१. मनीषा मांढरे - बायोलॉजी तज्ज्ञ

२. प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी - केमिस्ट्री तज्ज्ञ

३. मनीषा संजय हवालदार - फिजिक्स तज्ज्ञ

४. शिवराज रघुनाथ मोटेगावकर - 'आरसीसी' (रेणुकाई करिअर सेंटर) कोचिंग इन्स्टिट्यूट, लातूरचे संचालक

५. तेजस हर्षदकुमार शाह - 'अभंग प्रभू मेडिकल अकादमी' कोचिंग इन्स्टिट्यूट, पुणे येथील फिजिक्स प्राध्यापक आणि सीओओ

६. मनीषा संजय वाघमारे

७. धनंजय निवृत्ती लोखंडे

८. शुभम मधुकर खैरनार

९. यश यादव

१०. मांगीलाल बिवाल

११. विकास बिवाल

१२. दिनेश बिवाल

१३. डॉ. मनोज भगवानराव शिरुरे

दोषारोपपत्रातील महत्त्वाचे मुद्दे :

- आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, विश्वासघात, पुरावा नष्ट करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारास प्रतिबंध) कायदा २०२४ अंतर्गत गुन्हे दाखल.

- ३६० जणांचे जबाब नोंदवले

- ४२२ पुरावे न्यायालयात सादर

- ४३ वस्तू जप्त

‘नीट’ पेपरफुटीचे पुणे केंद्र ?

या प्रकरणात मुख्य सूत्रधार रसायनशास्त्राचा प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला ‘सीबीआय’ने पुण्यातून ताब्यात घेतले होते. पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणारी ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली होती. वाघमारेची चौकशी करण्यात आली. तेव्हा वाघमारेच्या घरात माॅडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्राची शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग घेतला होता, असे समोर आले होते. त्यानंतर मांढरेला अटक करण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.