नागपूरात शाळा महाविद्यालयाना सुट्टी जाहीर; उद्या ऑरेंज सिटीला ऑरेंज अलर्ट; दिवसभरात १७९ मिमी पाऊस
esakal July 28, 2026 11:45 PM

नागपूर शहराला मंगळवारी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. संततधार आणि जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले, तर सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दिवसभरात नागपूरमध्ये तब्बल १७९ मिमी पावसाची नोंद झाली असून, अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ३० जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, २९ जुलै रोजी काही भागांमध्ये अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Monsoon India 2026 : मान्सूनने देश व्यापला ! मुंबईत २७ वर्षांचा विक्रम मोडीत, अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना २९ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजच्या पावसाचा सर्वाधिक फटका शाळांना बसला आहे. खामला परिसरातील प्रसिद्ध सोमलवार शाळेच्या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचून मैदानाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं. काही ठिकाणी साडेतीन ते चार फूट पाणी साचल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनाही अडचणींचा सामना करावा लागला आहे.

Mumbai Heavy Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; वरळी, दादर, सायन, लोअर परळसह अनेक भाग जलमय, मध्य रेल्वे उशिराने

दरम्यान, नागपूरसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, सखल भाग टाळावेत आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने यंत्रणाही सतर्क करण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.