पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील जनता पाकिस्तानी सैन्य आणि सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे.पाकिस्तानी सैन्य आणि रेंजर्स पीओकेमधील हे विरोध प्रदर्शन दडपून टाकण्यासाठी अत्यंत क्रूरता दाखवत आहेत, बळाचा वापर करत आहेत. पाकिस्तानी सुरक्षापथकं निरपराध नागरिकांवर गोळ्या चालवत आहेत. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या जॉइंट अवामी कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आणि मंगळवारी 30 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. पीओकेच्या जनतेने भारतीय सैन्याकडे मदत मागितली आहे.
पीओकेमधील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात लोक भारतीय सैन्याला मदतीचं आवाहन करत आहेत. पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या ताब्यातील काश्मीरमध्ये खुलेआम कत्तल चालवली आहे. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात आमचे लोक शहीद झाले आहेत, असं एका महिलेने ऑनलाइन व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. आमच्या पीओकेमध्ये रक्ताचा सडा पडला आहे. महिलेने भारतीय सैन्याकडे पीओकेच्या लोकांना वाचवण्याचं आवाहन केलं आहे.
निवृत्त जवान आणि अधिकारी जखमी
कधी काळी पाकिस्तानी सैन्याला मदत करणाऱ्या, भारताविरुद्ध दहशतवाद्यांना प्रशिक्षित करणारे लोकही आता या आंदोलनात उतरले आहेत. एक एक्सक्लूसिव रिपोर्टनुसार, पीओकेमध्ये सुरु असलेल्या या विरोध प्रदर्शनात सुरक्षारक्षकांच्या गोळीबारात पाकिस्तानी सैन्याचे निवृत्त जवान आणि अधिकारी जखमी झाले आहेत.
SSG कमांडो फारुक सुधन जखमी
Osintv च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात पाकिस्तानी सैन्याचे रिटायर्ड SSG कमांडो फारुक सुधन जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भारताविरुद्ध हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांना ट्रेनिग देण्याचा फारुखवर आरोप आहे. दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणाऱ्या सुधनचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात तो जखमी अवस्थेत रुग्णालयातील बेडवर दिसत आहे.
याआधी जॉइंट अवामी कृती समितीने मंगळवारी सांगितलं की, मागच्या दोन दिवसात पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. JAAC नुसार सोमवारी 25 जणांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी पाच लोकांचा मृत्यू झाला. JAAC च्या प्रवक्त्याने पाकिस्तानी सैन्यावर मृतदेह गायब करण्याचाही आरोप केला.