राज्य सरकारचे मानाचे पुरस्कार जाहीर!  हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह 'या' दिग्गजांना जीवनगौरव पुरस्कार, वाचा यादी
abp majha web team July 29, 2026 08:13 PM

Life Time Achievement Awards: राज्य सरकारचे प्रतिष्ठेचे समजले जाणारे व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर करण्यात आलाय. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने बुधवारी ही घोषणा केली असून चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्गज कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच अभिनेते प्रसाद ओक यांना चित्रपट क्षेत्रातील विशेष योगदानासाठी या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून अभिनेत्री राणी मुखर्जीचाही या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अभिनय संगीत दिग्दर्शन निर्मिती अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी ही पुरस्कार दिले जातात. 

सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कारांची घोषणा..

सांस्कृतिक कार्य विभागाने बुधवारी 2025 चा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाल्याचा सांगितलं. पं हृदयनाथ मंगेशकर यांची मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांसह भक्तीगीत भावगीत आणि शास्त्रीय संगीतावर आधारित रचनांसाठी ओळख आहे. अभिनय क्षेत्रातील हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक यांनाही मराठी चित्रपट नाटक आणि टीव्ही क्षेत्रातील योगदानासाठी व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. धर्मवीर आणि धर्मवीर 2 या चित्रपटांच्या दिग्दर्शनामुळे देशभरात त्यांचे चर्च झाली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम जावेद यांनी जावेद अख्तर यांच्या साथीने शोले, दिवार, जंजीर यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा कथा लिहिल्या.  त्यांना अभिनय क्षेत्रातील प्रतिष्ठित राजकपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच अभिनेत्री राणी मुखर्जीला चित्रपट विश्वातील दमदार भूमिकांसाठी, योगदानासाठी राजकपूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी ब्लॅक हम तुम मर्दानी यासारख्या चित्रपटातील भूमिकांमुळे अनेक राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध सन्मान त्यांना मिळाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.