Civic Roads Protest: पुण्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महाविकास आघाडीचा महापालिका सभेत जोरदार आंदोलन, कामकाज ठप्प
esakal July 29, 2026 08:45 PM

पुणे : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन केले. सभेच्या प्रारंभीच महाविकास आघाडीतील नगरसेवकांनी महापौरांच्या व्यासपीठासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ सभागृहातील कामकाज ठप्प झाले.

पर्यावरण अहवाल सादर होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अॅड. नीलेश निकम, काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते काका चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते नितीन गावडे यांच्यासह महाविकास आघाडीतील नगरसेवकांनी आंदोलन सुरू केले.

“रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?”, “पुणेकरांना चांगले रस्ते मिळालेच पाहिजेत”, “खड्डेमुक्त पुणे झालेच पाहिजे”, “रस्ते आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे” अशा घोषणा देत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात, वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. खड्ड्यांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, शहरातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करावेत आणि खड्डेमुक्त पुण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही करण्यात आली.

आंदोलनामुळे काही काळ सभागृहातील कामकाज विस्कळीत झाले. त्यानंतर वातावरण निवळल्यानंतर नियमित कामकाजास सुरुवात करण्यात आली. मात्र, शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा महापालिकेच्या सभागृहात ऐरणीवर आला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.