नागपुरात अवघ्या काही तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत हा पाऊस अभूतपूर्व स्वरूपाचा असल्याचे म्हटले आहे. एका दिवसात सुमारे १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, त्यापैकी तब्बल ११० मिलिमीटर पाऊस केवळ सव्वा ते दीड तासांच्या कालावधीत कोसळला. त्यामुळे काही भागांत ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सखल भागांना बसला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, तर काही ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः तीन शाळांमध्ये पाणी घुसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने बचावकार्य राबवावे लागले. प्रशासनाने तत्परतेने कारवाई करत सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढल्याचे त्यांनी सांगितलं.
Pune: तिसऱ्या दिवशीही रस्त्यांवर पाणी; महापालिकेची यंत्रणा अपयशी; वारकऱ्यांना अडचणींचा सामनाया संकटात प्रशासनाने चांगले काम केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. काही भागांत अजूनही पाणी साचले असून ते हटविण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, संध्याकाळनंतर पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याबाबत प्रशासनाशी सातत्याने संपर्क असल्याचेही त्यांनी सांगितले.
Chhatrapati Sambhajinagar: जटवाडा गाव अडकले समस्यांच्या खड्ड्यांत; रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या समस्यांनी ग्रामस्थ हैराण; ग्रामस्थ म्हणतात, शहराचा मार्ग सुखकर कधी होईल?राज्यात अलीकडच्या काळात हवामानाचा बदलता पॅटर्न चिंताजनक असल्याचेही फडणवीस म्हणाले. पालघर, नाशिक आणि नागपूरसारख्या ठिकाणी महिनाभराचा पाऊस एक-दोन दिवसांत होत असल्याने नैसर्गिक निचरा व्यवस्था आणि विद्यमान ड्रेनेज यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. अशा परिस्थितीत फ्लॅश फ्लडसारख्या घटना वाढत असून, भविष्यात पावसाच्या बदलत्या स्वरूपाचा सखोल अभ्यास करून त्यानुसार पायाभूत सुविधांचे नियोजन करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही भागांत सुरू असलेली विकासकामे आणि अर्धवट प्रकल्पांमुळेही काही ठिकाणी पाणी साचल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे.