Maharashtra Politics Live Update : दिलीप वळसे पाटील ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या भेटीला
Sarkarnama July 29, 2026 08:45 PM
NCP leader : दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण विषयावर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीला माजी मंत्री दिलीप वळसे पाटील पोहोचले आहेत. या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होत आहे, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. मात्र गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु असतानाच या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

जालन्यात महिला जीएसटी अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; कर सल्लागारालाही अटक

जालना येथे इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मंजूर करून देण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्यकर अधिकारी सुवर्णा लोहिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. या प्रकरणात कर सल्लागार अक्षय लोढा यालाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन; मनोज जरांगे पाटील यांचे एकजुटीचे आवाहन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठवाड्यातील सर्व प्रलंबित नोंदींची प्रमाणपत्रे आणि हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व मराठा समाजाने मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया; 'विपर्यास करण्यात आला'

शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. पाटील यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे भरणे यांनी स्पष्ट करत टीकेला उत्तर दिले.

MPSC राज्य उत्पादन शुल्क विभाग उपनिरीक्षक पद भरतीला स्थगिती; न्यायालयाने घेतली दखल!

एमपीएससीच्या कथित पेपरफुटीच्या प्रकरणाची गंभीर दखल कोर्टाने घेतली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षक पद भरतीमध्ये पेपरफुटी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या जुन्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गंभीर दखल घेत पुढील आदेशापर्यंत भरती प्रक्रिया जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि एमपीएससी सचिवांना नोटीस बजावून 4 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले देण्यात आले आहेत.

पंधरा लाखांचे एमडी ड्रग्स पकडले; मानवत पोलिसांची मोठी कारवाई

मानवत पोलिसांनी तालुक्यातील रत्नापूर शिवारात धाड टाकत तब्बल 14 लाख 64 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे मानवत पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचे धागेदोरे आणखी किती खोलवर गेले आहेत याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

काँग्रेसचे फॉलोवर सुद्धा राहिलेले नाहीत - गिरीश महाजन

काँग्रेसचा आता कोणताही अजेंडा राहिलेला नाही. त्यांचे फॉलोवर सुद्धा राहिलेले नाहीत. विधानसभा महानगरपालिका अशा कोणत्याही ठिकाणी त्यांचं अस्तित्व राहिलेले नाही.असं काहीतरी झालं की घोषणा द्यायच्या निदर्शना करायची, याशिवाय त्यांचा अस्तित्व राहिलेलं नाही. अशा शब्दात काँग्रेसवर मंत्री गिरीश महाजन यांनी घणाघात केला आहे. ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता विमानतळ येथे बोलत होते.

सहकार विभागाकडून आयुक्तांना कोल्हापूर जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश

पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा बँकेच्या चौकशी संदर्भात वारंवार भाजप नेत्यांकडून तक्रारी झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. पाठोपाठ कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या ही विविध चौकशी मागणी झाल्याने महायुतीतील घटक पक्षांचे राजकीय रंग दिसून आले. भाजपकडून महायुतीतल्या घटक पक्षांना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना सहकार क्षेत्रात लक्ष करत असताना आता कोल्हापूर जिल्हा बँकेकडे मोर्चा वळवला आहे. नुकतेच सहकार व पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी सुधीर अमृते यांनी विभागीय आयुक्तांना जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध

राज्य सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी (ता.२८ ) परिपत्रकाद्वारे दिला. नव्या नियमांनुसार, शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य अथवा केंद्र सरकारच्या कोणत्याही चालू किंवा अलीकडील धोरणांवर, कृतींवर किंवा राजकीय घडामोडींवर प्रतिकूल टिप्पणी किंवा टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानीकारक अथवा समाजात भेदभाव निर्माण करणारा कोणताही मजकूर शेअर, फॉरवर्ड किंवा अपलोड न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

नीट पेपरफुटी प्रकरणात आज दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी

सीबीआय ने दाखल केलेले दोषारोपपत्रात १३ आरोपींची नावे असून या आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र सादर केले आहे. अर्जुन आनंद यांची दिल्ली येथील राउज एवेन्यू कोर्ट मध्ये सुरू असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सी बी आय चे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आज या प्रकरणी कोर्टात सुनावणी होणार आहे. डिजिटल फॉरेन्सिक अहवाल, हस्ताक्षर तज्ञांची मतं आणि शैक्षणिक विभागातील तज्ज्ञांची मतं सी बी आय ने जाणून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी निघाला गिरीश महाजन यांचा निवडणूक प्रचारक!

शालार्थ आयडी घोटाळा शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा कळस ठरला आहे. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेतेच अडकल्याचे चित्र आहे. त्यात आता भाजप नेता जाळ्यात अडकला. जामनेर (जळगाव) मतदार संघात बडे राजकीय प्रस्थ असलेले संजय भास्करराव गरुड यांना पोलिसांनी अटक केली. १६० कोटींच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात ते आरोपी आहेत. गरुड यांच्या अटकेने मंत्री गिरीश महाजन देखील चर्चेत आहेत. जामनेर मतदार संघात गिरीश महाजन यांचे निवडणुकीत प्रचारक होते.

District Collector reviews Health Department: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या विविध विषयांचा आढावा

प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याच्याकरिता आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने ग्राम विकास, महसूल व आरोग्य विभागाने मोहिम स्वरुपात कार्यवाही करावी, केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी; आरोग्य सुविधेपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

Mohan Bhagwat Letter: काँग्रेस नेत्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांना खळबळजनक पत्र

पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या कारभारावर आणि कथित भ्रष्टाचारावर निशाणा साधत महापालिकेतील काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद तुकाराम शिंदे यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पत्र पाठवून गंभीर आरोप केले आहेत. महापालिकेत "देवाभाऊंचा निरोप आहे" असे सांगून आर्थिक गैरव्यवहार, टेंडर घोटाळे आणि नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा घणाघाती आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे.

RMC Vehicles Permission: शनिवार-रविवारी मिक्सर (RMC) वाहनांना दिवसा प्रवेशास परवानगी

पुणे शहरातील वाहतुकीचे प्रभावी नियोजन, संभाव्य वाहतूक कोंडी टाळणे तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट (RMC) मिक्सर वाहनांच्या वाहतुकीबाबत प्रायोगिक स्वरूपात नवीन वाहतूक नियमन लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिसूचना तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील संबंधित तरतुदींनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी हा आदेश निर्गमित केला आहे.

या आदेशानुसार, पुणे शहरातील सुरू असलेल्या बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या मिक्सर (RMC) वाहनांना शनिवार व रविवार सकाळी ६.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत रेड झोनसह पुणे शहर हद्दीत कोणतीही आगाऊ परवानगी न घेता प्रवेश व वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी केवळ मिक्सर (RMC) वाहनांसाठी लागू असून, जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर, इतर स्लो-मुव्हिंग वाहने तसेच मालवाहू जड वाहनांना या आदेशाचा लाभ लागू होणार नाही.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी कधी ऑगस्टमध्ये

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची बहुप्रतिक्षित पहिली यादी अखेर जाहीर झाली असून, दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पहिल्या यादीतून वंचित राहिलेल्या किंवा ज्यांचे अर्ज प्रक्रियेत आहेत, अशा शेतकऱ्यांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे लागले आहे. ही दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात महा-आयटीच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल.

Amit Shah Pune Daura: गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध

गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. शहांच्या विरोधात पुण्यात काँग्रेस आंदोलन करणार आहे. आंदोलनाच्या परवानगीसाठी काँग्रेसने पुणे पोलिसांना पत्र दिले आहे.आंदोलन करण्यासाठी पुणे काँग्रेसने पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. मात्र, पुणे पोलिसांची परवानगी दिली नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.