Neeraj Chopra Javelin Throw Live Streaming Details : ग्लासगोमध्ये सध्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू चमकतानाही दिसत आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी वर्चस्व राखल्यानंतर ऍथलेटिक्समध्येही भारतीय खेळाडूंनी डंका वाजवला आहे.
मात्र ऍथलेटिक्सच्या स्पर्धा सुरू झालेल्या असतानाच अनेकांना प्रश्न पडला आहे की भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) मैदानात कधी दिसणार, तो यंदा ही स्पर्धा खेळणार की नाही? नीरज २०२२ मध्ये दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धा(Commonwealth Games) खेळला नव्हता. मात्र यंदा तो सहभागी होणार असून भारताला त्याच्याकडून पुन्हा एकदा सुवर्णपदकाची आशा आहे.
Commonwealth Games : मुसळधार पावसात भारताच्या गुरवीर सिंगनं घडवला इतिहास! वाऱ्याच्या वेगासारखा धावत जिंकलं मेडल; Videoनीरजने गोल्ड कोस्टला झालेल्या २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. मात्र त्यानंतर २०२२ मध्ये दुखापतीमुळे त्याला बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. परंतु, त्याने यापूर्वीच स्पष्ट केले होते की तो ग्लासगोमधील राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार असून दुसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेचे पदक जिंकण्याचा प्रयत्न करेल.
राष्ट्रकुल स्पर्धेतही पुरुषांच्या भालाफेकीच्या दोन फेऱ्या होतील, पहिल्यांदा पात्रता फेरी (Qualifiers) होईल आणि नंतर अंतिम फेरी (Final) होईल. पात्रता फेरीतून अंतिम फेरीसाठी खेळाडूंना पात्रता सिद्ध करावी लागेल. त्यामुळे नीरजही बाकी खेळाडूंप्रमाणे आधी पात्रता फेरी खेळताना दिसेल. तिथून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला, तर तो अंतिम फेरी खेळेल.
कधी आणि कुठे पाहाणार सामना?राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मधील पुरुषांच्या भालाफेकीची पात्रता फेरी गुरुवारी (३० जुलै) भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारीच नीरजला मैदानात पाहाण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.
त्यानंतर या स्पर्धेतील अंतिम फेरी शुक्रवारच्या रात्री म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारीची (१ ऑगस्ट) सुरुवात होत असताना रात्री १२.४५ वाजता सुरू होईल. त्यामुळे या फेरीत नीरजला पाहण्यासाठी मात्र भारतीय क्रीडा प्रेमींना रात्री जागावे लागणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळांचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर भारतात सोनी स्पोर्ट्स टेन २ या चॅनेलवर पाहाता येत आहे, तसेच SonyLiv या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येत आहे. त्यामुळे पुरुषांच्या भालाफेकीची पात्रता फेरी व अंतिम फेरीही या चॅनेलवर आणि ओटीटी प्लॅटफॉमवर क्रीडा चाहत्यांना पाहाता येणार आहे.
पात्रता फेरीत १४ देशांमधील १८ भालाफेकपटू सहभागी होणार आहेत. यात भारताचे तीन खेळाडू आहेत. नीरजसह भारताचे रोहित यादव आणि यश वीर सिंग हे देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या स्पर्धेत पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम (Pakistan's Arshad Nadeem) आणि श्रीलंकेचा स्टार खेळाडू रुमेश थरंगा पाथिरागे (Sri lankan Rumesh Pathirage) हे देखील सामील होणार आहेत. या दोघांचेही मोठे आव्हान नीरजसमोर असेल.
नदीमने यापूर्वी ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरजला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले होते. पण गेल्या काही काळात दुखापतीमुळे तो फारसा खेळलेला नाही. पण तो मोठा धोका ठरू शकतो.
Commonwealth Games: नाशिकच्या सर्वेश कुशारेचा ग्लासगोमध्ये डंका ऐतिहासिक रौप्य पदक जिंकत उंचावली तिरंग्याची शानयाशिवाय पाथिरागेही नीरजचा स्पर्धेक म्हणून उदयास आला आहे. त्याने या हंगामाच्या सुरुवातीलाच ९२.६२ मीटरचा थ्रो केला होता. सध्याच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये त्याने केलेला हा सर्वात लांब थ्रो आहे.
याशिवाय इतिहासात कोणत्याही आशियाई खेळाडूने केलेला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम थ्रो आहे. त्याने दोहा डायमंड लगीमध्येही नीरजला मागे टाकले होते. त्यामुळे त्याचेही मोठे आव्हान नीरजसमोर असणार आहे. एकूणच यंदा नीरज, नदीम आणि पाथिरागे या तीन आशियाई खेळाडूंमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळण्याती शक्यता आहे.