Bank Theft : पणदरेतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून १४ लाखांची रोकड लंपास; सराईत चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू
esakal July 29, 2026 11:45 PM

माळेगाव : बारामती तालुक्यातील पणदरे येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडसी डल्ला मारला. कटरच्या साह्याने एटीएम मशीन फोडून तब्बल १४ लाख १९ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून माळेगाव पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे.

याप्रकरणी बँक ऑफ इंडिया, पणदरे शाखेचे व्यवस्थापक तुषार लीलाधर पाटील यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन कटरच्या साह्याने फोडून त्यामधील १४ लाख १९ हजार १०० रुपयांची रोकड चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ आदी पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून उपलब्ध पुरावे व फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकपाळ यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पणदरे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. वरील प्रकरणातील चोरटे हे सराईत गुन्हेगार आहेत, अशी प्राथमिक तपासामध्ये माहिती पुढे आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास साळवे करीत आहेत. या धाडसी चोरीमुळे पणदरेसह बारामती तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.