Maharashtra News Live Update: तुकाराम मुंडेंच्या विरोधात FDA कर्मचाऱ्यांचा एल्गार
Sarkarnama July 30, 2026 02:45 PM
‘टेलिग्राम’चा संस्थापक गुन्हेगारांच्या यादीत

‘टेलिग्राम’ या मेसेजिंग अॅपचा संस्थापक पावेल डुरोव्ह यांच्यावर दहशतवादाला मदत केल्याचा ठपका रशियाने ठेवला. तसेच, त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या यादीमध्ये टाकले आहे. रशियाकडून ‘टेलिग्राम’वरील निर्बंध अधिक कडक केले जात असताना डुरोव यांच्यावरील ही कारवाई करण्यात आली आहे.

तुकाराम मुंडेंच्या विरोधात मंत्र्यांकडे तक्रार

छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे थेट निवेदन दिले आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीविरोधात गंभीर तक्रार केली आहे. या निवेदनात आयुक्तांच्या आदेशानंतर प्रयोगशाळेत दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्यात आल्याचा, प्रत्येक शनिवारी अनिवार्य उपस्थिती लावण्यात आल्याचा, तसेच पूर्वपरवानगीशिवाय रजा नाकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या ६५ लाखांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वाद

उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा सध्या वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. शहरात रस्ते, पाणी, सांडपाणी आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न कायम असताना तब्बल ६५ लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवक प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला गेल्याने नागरिकांमधून आणि विरोधकांकडून टीका होत आहे.

शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणाची आज सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणाची सुनावणी आज निश्चित करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाला चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली आहे.

भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत आदेश

घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरु ठेवताना संबंधित भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलिसांना सादर करण्याबाबतचे अपर जिल्हादंडाधिकारी यांन आदेश काढले आहे. पोलीस स्टेशनला माहिती देतांना भाडेकरुचे संपूर्ण नाव, सद्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणा-या व्यक्तींचे नाव व पत्ता, करारनामा, ओळखपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. अन्यथा पोलिसांकडून घरमालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे,

बहुप्रतीक्षित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी

बहुप्रतीक्षित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी झाली आहे. मेट्रो मार्गिका क्रमांक ३ वर मेट्रोची ट्रायल रन पूर्ण झाली आहे. प्रवासी सेवा सुरू होण्याच्या दिशेने पुणे मेट्रोचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. शिवाजीनगर - हिंजवडी हा मार्ग २३.२०३ किलोमीटरचा आहे. तर या नव्या मार्गावर एकूण मार्गावर २३ स्थानके आहेत. यामुळे हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय परिसर जोडला जाणार पहिल्या टप्प्यात १२ स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासासाठी महिलांना एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य होणार असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील विविध एसटी आगारात महिला प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. कार्ड नोंदणीसाठी आवश्यक कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने अनेक आगारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.