सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  
आफताब शेख, एबीपी माझा July 30, 2026 09:43 PM

Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. ‘ऑपरेशन समन्वय’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 2 कोटी 2 लाख 54 हजार 758 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून तब्बल 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त 

मिळालेल्या माहितीनुसार आरोपींकडून तब्बल 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच 19  हजार 200 लिटर तयार ब्लेंड आणि 13 हजार 600 लिटर स्पिरीट हस्तगत करण्यात आलं आहे. बनावट मद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी लेबल, बॉटलिंग मशिनरी आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी 7 वाहने देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहेत. बनावट मद्यामध्ये मिथेनॉलसारख्या घातक रसायनांचा वापर होण्याची शक्यता असल्याने अशा मद्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अवैध किंवा बनावट मद्याची निर्मिती आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावं, असं आवाहनही विभागाकडून करण्यात आलं आहे.

वाशिमच्या तऱ्हाळा येथे अवैध दारू विक्री विरोधात रास्ता रोको

वाशिमच्या तऱ्हाळा येथेअवैध दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी गुरुवारी संभाजीनगर–नागपूर  जुन्या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं आहे. गावकऱ्यांनी वारंवार लेखी तक्रारी  निवेदने देऊनही अवैध दारू विक्रीवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. गावातील अवैध दारू विक्रीमुळे व्यसनाधीनता वाढून अनेक कुटुंबांमध्ये वाद, सामाजिक अशांतता निर्माण होत असल्याची आरोप करण्यात आला आहे. आंदोलनामुळं काही काळ महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. या कारवाईच्या आश्वासना नंतर  आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं आहे.

नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई

 
नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुजरातकडे नेला जाणारा विदेशी बिअरचा साठा जप्त केला आहे. मध्य प्रदेशातून चारचाकी वाहनाद्वारे गुजरातमध्ये विदेशी दारूची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला आणि संशयित वाहन अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात विदेशी बिअरचा साठा आढळून आला. या कारवाईत चारचाकी वाहनासह6 लाख 36 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये दारुबंदी असल्याने सीमावर्ती भागातून होणाऱ्या अवैध दारु तस्करीविरोधात नंदुरबार पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा घाव घातला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.