पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
abp majha web team July 30, 2026 09:43 PM

Spider-Man Box Office Collection: हॉलिवूडचा बहुप्रतीक्षित 'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे' (Spider Man Box Office Collection) हा चित्रपट प्रदर्शित होताच भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिस पछाडलंय. विशेष म्हणजे, 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनलाही या चित्रपटाने मागे टाकले आहे.

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस दणाणलं...

सॅकनल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भारतात 29.03 कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशभरात चित्रपटाचे 11,941 शो सुरू असून एकूण ऑक्युपन्सी 68 टक्के नोंदवली गेली.

इंग्रजी: 14.34 कोटी रुपये

हिंदी: 11.04 कोटी रुपये

तमिळ : 1.71 कोटी रुपये

तेलुगू : 1.87 कोटी रुपये

कन्नड : 3 लाख रुपये

मल्याळम : 4 लाख रुपये

याआधी सायंकाळी 5 वाजेपर्यंत चित्रपटाने 24.30 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यावेळी 10,647 शोमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि ऑक्युपन्सी 68.9 टक्के होती.

पहिल्याच दिवशी 15 चित्रपटांना टाकलं मागे

'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे'ने पहिल्याच दिवशीच्या कमाईने 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. यात 'वेलकम टू द जंगल', 'धमाल 4', 'अल्फा', 'राजा शिवाजी', 'भूत बंगला', 'मर्दानी 3', 'ओ रोमियो', 'इक्कीस', 'पति पत्नी और वो 2' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

भारतात सहा भाषांमध्ये प्रदर्शित

हा चित्रपट भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीपासूनच सर्व भाषांमध्ये चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

चित्रपटात कोणते कलाकार?

'स्पायडर मॅन'चे दिग्दर्शन डेस्टिन डॅनियल क्रेटन यांनी केले आहे. 2 तास 25 मिनिटांच्या या चित्रपटात टॉम हॉलंड पुन्हा एकदा स्पायडर मॅनच्या भूमिकेत दिसत असून, त्याच्यासोबत झेंडाया, मार्क रफालो, सॅडी सिंक, जॉन बर्नथल आणि जेकब बॅटलन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाला मिळतोय दमदार प्रतिसाद

चित्रपटाच्या कथेला, भावनिक मांडणीला, टॉम हॉलंडच्या अभिनयाला तसेच ॲक्शन सीक्वेन्स, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि सिनेमॅटोग्राफीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे' पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.