उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
अनिल वर्मा, एबीपी माझा August 16, 2026 09:13 PM

ठाणे : आजार बरा करून देण्याच्या आणि तंत्र-मंत्र आणि जंतर-मंतरच्या नावाखाली 30 वर्षीय महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी (Bhiwandi) शहरातील वऱ्हाळ देवी चौक परिसरातील हजरत सय्यद सुफी कुतुब अब्दाल जलालुद्दीन शाह रहमतुल्लाह दर्गाह येथून समोर आला आहे. या दर्ग्यातील मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख याच्यावर महिलेने गंभीर आरोप केले आहेत. उपचाराच्या नावाखाली महिलेचे व्हिडिओ कॉलद्वारे चित्रीकरण केल्याचा, तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ तयार केल्याचा गंभीर आरोप महिलेने केले आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेने भिवंडी शहर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत उत्तर प्रदेशला (UP) पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख (50) याला भायखळा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेत अटक केली.  

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला एका खासगी रुग्णालयात असिस्टंट म्हणून काम करते. तिला आजाराचा त्रास असल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी वऱ्हाळ देवी चौक परिसरातील हजरत सय्यद सुफी कुतुब अब्दाल जलालुद्दीन शाह रहमतुल्लाह दर्गाह येथील मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. हा मौलाना या दर्ग्यात 2013 पासून काम पाहत आहे. नातेवाईकांनी सांगितल्यानुसार महिला 2024 मध्ये उपचारासाठी दर्ग्यात गेली होती. आजार बरा करून देण्याचे आश्वासन देत आरोपीने महिलेला जंतर-मंतर आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली विविध विधी करण्यास सुरुवात केली. महिलेचे बांधलेले केस सोडणे, हात धरले, लिंबू कापणे आणि इतर कथित अघोरी विधी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. उपचाराच्या नावाखाली महिलेच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप असून, महिलेने विरोध केला असता उपचारासाठी हा विधी आवश्यक असल्याचे आरोपीने सांगितल्याचा दावा आहे.

एवढेच नव्हे तर आरोपीने महिलेला उपचार करण्यासाठी रात्री दर्ग्यात बोलावून घेत विविध विधी करण्याच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केला. उपचाराच्या नावाखाली व्हिडिओ कॉलद्वारे महिलेचे चित्रीकरण करण्यात आले. तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराचेही व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे आरोपीने महिलेला सांगित तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याचे आरोपीने फोनवरून सांगितल्यानंतर महिला घाबरली. त्यानंतर तिने भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 मधील कलम 3, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66 ई आणि 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी मौलवी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत भायखळा रेल्वे स्थानकातून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील कथित व्हिडिओ नेमके कोणी तयार केले, ते कुठे आणि कसे व्हायरल झाले, तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास भिवंडी शहर पोलीस करीत आहेत.

धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.