अमेरिकेतील व्हर्जिनिया आणि मिशिगनमध्ये गोळीबार, ६ जणांचा मृत्यू
Marathi August 16, 2026 09:24 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे. मिशिगन आणि व्हर्जिनिया येथे घडलेल्या गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिशिगनमधील गोळीबारात संशयित हल्लेखोरासह ६ जणांचा बळी गेला आहे, तर व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिशिगनच्या मिसौकी काउंटीमध्ये एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात पाच निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेट्रॉईटपासून सुमारे १७० मैल अंतरावर असलेल्या एका घरात १६ वर्षांचा मुलगा, ४५ वर्षीय पुरुष आणि ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. याच ठिकाणी एक १३ वर्षांची मुलगी गंभीर जखमी अवस्थेत सापडली.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. तपासादरम्यान दुसऱ्या एका घरात ५३ वर्षीय पुरुषाचा मृतदेह सापडला. त्यानंतर जंगलात ३९ वर्षीय संशयित हल्लेखोर चॅड हिकमॅन याचाही मृतदेह आढळून आला. ज्याच्या जवळ एका २९ वर्षीय महिलेचा मृतदेह होता. या सर्व हत्या गोळी मारून करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, हल्लेखोर हिकमॅन याला २०२४ मध्ये बाल अत्याचाराच्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत ५ जण जखमी

दुसरी घटना व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये घडली. शनिवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाबाहेरगोळीबार झाला. यात ५ जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून, इतर चौघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींपैकी केवळ एक जण या विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याची पुष्टी झाली असून त्याला उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव कॅम्पसमध्ये तात्काळ लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. नंतर धोका नसल्याची खात्री झाल्यावर हे लॉकडाऊन हटवण्यात आले. सोमवारपासून विद्यापीठाचे नवे शैक्षणिक सत्र सुरू होणार असतानाच ही धक्कादायक घटना घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.