राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, घाटमाथ्यावर धो-धो कोसळणार; तर पूर्व विदर्भला अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
एबीपी माझा वेब टीम August 24, 2026 12:13 PM

Maharashtra Rain News :  राज्यात मागील काही दिवसापासून पावसाने (Maharashtra Rain) विश्रांती घेतल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान पावसानं उसंत घेतल्याने बळीराजा चिंतेत आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील अनेक भागात अद्याप दमदार पावसाची (Maharashtra Rain News) प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या काही दिवसात बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली सक्रिय झाले असून त्याचा प्रभावामुळे राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस, तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून राज्यात मंगळावरपर्यंत (25 ऑगस्ट) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. (Maharashtra Weather)

Maharashtra Rain News : घाटमाथ्यासह विदर्भात दमदार पाऊस पडण्याची शक्यता

राज्यातील शेतकरी सध्या मोठा संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्यांचा कालावधी होऊन गेला तरी अद्यापही राज्याच्या अनेक भागात पावसानं समाधानकारक हजेरी लावली नाहीये. यामुळं आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या, जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती आता जाणवू लागली आहे. अशातच हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज (24 ऑगस्ट रोजी) देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतातील उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात पावसाचा जोर कायम राहील. तर राज्यात महाराष्ट्रातील घाटमाथ्यासह विदर्भात दमदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Rain : राज्यात कुठे कोसळणार पावसाच्या सरी, हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 7 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात हलक्या सरी बरसणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 ऑगस्ट रोजी कोकण-गोवा परिसरातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा या भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Rain :  पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत इतर भागांच्या तुलनेत पाऊस अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करावे.

गोसेखुर्द धरणाचा विसर्ग15 हजार 911 क्युसेक प्रति सेकंदानं वाढविला, 23 दरवाजांमधून विसर्ग सुरू

गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. परिणामी, पाणलोट क्षेत्रातील पुजारीटोला आणि धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत होत आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. थेट गोसेखुर्द धरणात प्रवाहित होत असल्यानं धरणाच्याही जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे, आणि जलसाठा नियंत्रित राहावा आणि कुठेही पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी गोसेखुर्द धरण प्रशासनानं धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ केली आहे. दुपारपर्यंत धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडून त्यातून 81 हजार 506 प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, दुपारी पडलेल्या मुसळधार पावसानंतर धरण प्रशासनानं सायंकाळी आणखी ४ दरवाजे उघडलेले आहेत. सध्या गोसेखुर्द धरणाचे 23 दरवाजे अर्धा मीटरनं सुरू असून त्यातून 96  हजार 417 क्युसेक प्रतिसेकंद वेगानं म्हणजेचं दुपारच्या तुलनेत 15 हजार 911 क्युसेक प्रति सेकंदानं पाण्याचा विसर्ग वाढविला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.