आंतरराष्ट्रीय नार्को-टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश
Marathi August 24, 2026 12:25 PM

दिल्ली गुन्हे शाखेची कारवाई : खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंगशी संबंध उघड

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका आंतरराष्ट्रीय नार्को-टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. हे नेटवर्क घोषित खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग गिल उर्फ अराश दल्ला याच्याशी संबंधित आहे. या नेटवर्कमधील सदस्य दहशतवादाला निधी पुरवण्यातही सामील होते. गुन्हे शाखेच्या द्वारका युनिटने चार कथित सदस्यांना अटक करतानाच एकूण 5.138 किलो अफू जप्त केले आहे. चार आरोपींना अटक करूनही, पोलीस अजूनही परदेशी सूत्रधार आणि फरार संशयितांचा शोध घेत आहेत.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सीमापार अफूची तस्करी आणि अमली पदार्थांच्या बदल्यात शस्त्रास्त्रांच्या व्यापारात गुंतलेल्या एका आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या नेटवर्कचे संबंध पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि परदेशाशी होते. भारतातून कॅनडाला अफूची तस्करी केली जात होती आणि त्या बदल्यात शस्त्रs पुरवली जात असल्याचा हा प्रकार उघड झाला आहे. तपास जसजसा पुढे जाईल, तसतशी या अमली पदार्थ-दहशतवादी नेटवर्कशी संबंधित आणखी व्यक्तींची नावे समोर येऊ शकतात, असे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे.

दिल्लीहून कॅनडाला पाठवण्यात येत असलेल्या एका कुरिअर पार्सलच्या तपासादरम्यान हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. बिस्किटे, मिठाई आणि घरगुती वस्तूंच्या खाली अंदाजे 3 किलो अफू लपवण्यात आले होते. यासंबंधीचा तपास पुढे सरकत असताना, पोलिसांनी विविध ठिकाणांहून एकूण 5.138 किलो अफू जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी सिमरनजीत सिंग, हरदीप सिंग, यादविंदर सिंग आणि जीवन सिंग यांना अटक केली. चौकशी आणि मोबाईल फोनच्या तपासणीदरम्यान, पोलिसांना संपूर्ण नेटवर्कबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी बनावट केवायसी वापरून आणि दुसऱ्यांच्या नावाखाली कुरिअर बुक केले होते. अफू बॉक्सच्या तळाशी आणि कधीकधी कपड्यांमध्ये लपवून पाठवले जात होते. नेटवर्कचे सदस्य एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कॅनेडियन नंबरसह व्हॉट्सअॅप आणि सिग्नलसारख्या अॅप्सचा वापर करत होते. या अमली पदार्थांमधून मिळणारा पैसा टोळ्या आणि दहशतवादी कारवायांना निधी देण्यासाठी वापरला जात होता, असा पोलिसांचा दावा आहे.

पाकिस्तानमधून शस्त्रतस्करी

या तपासात शस्त्रास्त्रांच्या बदल्यात अमली पदार्थ देण्याचे एक मोठे जाळे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांच्या बदल्यात पाकिस्तानमधून पंजाबच्या सीमावर्ती भागात ड्रोनद्वारे शस्त्रs पोहोचवली जात होती, असा पोलिसांचा दावा आहे. हे नेटवर्क कॅनडात असलेल्या अर्शदीप सिंग उर्फ अर्श दल्ला या घोषित खलिस्तानी दहशतवाद्याशी संबंधित आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अर्श दल्ला 2018 मध्ये कॅनडाला गेला होता आणि जानेवारी 2023 मध्ये भारताने त्याला दहशतवादी घोषित केले. कॅनडात अंदाजे 3.5 कोटी रुपयांच्या अफूच्या विक्रीतून मोठा नफा कमावला गेला. यातील काही रक्कम टोळीला निधी पुरवण्यासाठी वापरली गेली, तर उर्वरित रक्कम शस्त्रs आणि कथित दहशतवादी कारवायांसाठी वापरली गेली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.