रिलीजपूर्वीच यशच्या 'टॉक्सिक'चा धुमाकुळ; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्याच दिवशी धुरंधरलाही टाकलं मागं, किती कमावले?
abp majha web team August 24, 2026 03:43 PM

Toxic Advance Booking: साऊथ सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ (Toxic) या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग 21 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगला तीन दिवस पूर्ण झाले असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून किती कमाई?

‘टॉक्सिक’च्या ॲडव्हान्स बुकिंगने देशभरात वेग पकडला असून यामध्ये कर्नाटक आघाडीवर आहे. ताज्या डेटानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवसासाठी केवळ ॲडव्हान्स बुकिंगमधून तब्बल 21.5 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.देशभरातील 13,591 शोसाठी आतापर्यंत 5 लाख 55 हजार 328 तिकिटांची विक्री झाली आहे. ब्लॉक करण्यात आलेल्या आणि होल्डवर ठेवलेल्या सीट्सचा विचार केल्यास ही ग्रॉस कमाई तब्बल 30.14 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते.वीकेंडमध्ये ‘टॉक्सिक’च्या ॲडव्हान्स बुकिंगला चांगली गती मिळाली असून रिलीजपूर्वीच चित्रपट मजबूत स्थितीत पोहोचल्याचं चित्र आहे.

सर्वाधिक बुकिंग या राज्यातून

यशचं होम स्टेट असलेलं कर्नाटक ‘टॉक्सिक’च्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक योगदान देत आहे. थेट बुकिंगमधूनच कर्नाटकात चित्रपटाने 10 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.बेंगळुरू हे चित्रपटासाठी सर्वात मजबूत केंद्रांपैकी एक ठरत आहे. त्याचबरोबर म्हैसूर, शिवमोग्गा आणि रायचूरसारख्या शहरांमध्येही ‘टॉक्सिक’साठी मोठी मागणी पाहायला मिळत आहे.

6 भाषांमध्ये होणार रिलीज

‘टॉक्सिक’ हा केवळ एका भाषेतील प्रेक्षकांवर अवलंबून असलेला चित्रपट नाही. हा चित्रपट कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाला देशभरात मोठ्या प्रमाणावर थिएटर रिलीज मिळणार आहे.

‘धुरंधर’ला टाकलं मागे

ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ‘टॉक्सिक’ने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’लाही मागे टाकल्याचा दावा करण्यात येत आहे. ‘धुरंधर’च्या पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून ब्लॉक करण्यात आलेल्या सीट्ससह सुमारे 14 कोटी रुपयांची कमाई झाली होती. तर ‘टॉक्सिक’ने ब्लॉक आणि होल्ड सीट्ससह 30.14 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. त्यामुळे यशचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती मोठा धमाका करतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.