स्वयंपाकघर कितीही छोटं असलं तरी त्यात भांडी, डबे, मसाल्याचे बॉक्स, किराणा आणि रोजच्या वापराच्या वस्तू ठेवताना जागा अपुरीच पडते. अनेकदा गरजेच्या वस्तू शोधताना डबे बाहेर काढावे लागतात आणि किचनचा पसारा वाढतो. पण काही स्मार्ट स्टोरेज हॅक्स वापरले, तर कमी जागेतही किचन नीटनेटके आणि प्रशस्त ठेवता येते. जाणून घेऊयात काही सोपे स्टोरेज हॅक्स
उभ्या जागेचा स्मार्ट वापर
किचनमध्ये फक्त कपाटांच्या आतली जागा वापरण्याऐवजी भिंती आणि कपाटांचे दरवाजेही वापरता येतात. हुक्स, छोट्या रॅक्स किंवा मॅग्नेटिक स्ट्रिप्स लावून चमचे, झाकणं, मसाल्याच्या छोट्या डब्या अशा वस्तू व्यवस्थित ठेवता येतात.
डबे एकसारखे ठेवा
वेगवेगळ्या आकाराचे डबे एकमेकांवर रचताना बरीच जागा वाया जाते. शक्य असल्यास समान आकाराचे आणि एकावर एक व्यवस्थित बसणारे एअरटाइट डबे वापरा. डब्यांवर नाव किंवा लेबल लावल्यास प्रत्येक वस्तू शोधताना वेळही वाचतो.
प्रत्येक कोपरा वापरा
कपाटात एकाच मोठ्या शेल्फवर वस्तू ठेवण्याऐवजी छोट्या स्टॅकिंग रॅक्सचा वापर करता येतो. यामुळे एका शेल्फवर दोन रॅक तयार होतात. विशेषतः प्लेट्स, कप, वाट्या आणि मसाल्याच्या डब्यांसाठी ही पद्धत उपयोगी ठरते.
रोजच्या वस्तू हाताशी ठेवा
दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू पुढच्या बाजूला आणि क्वचित वापरल्या जाणाऱ्या वस्तू वरच्या किंवा मागच्या कप्प्यात ठेवणे हा साधा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी कपाटातील सगळ्या वस्तू हलवण्याची गरज पडत नाही.
किचनमध्ये जागा वाढवण्यापेक्षा उपलब्ध जागेचा योग्य वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे. अनावश्यक वस्तू नियमितपणे बाजूला काढा, प्रत्येक वस्तूसाठी ठराविक जागा ठेवा आणि उभी जागा वापरण्याची सवय लावा. काही छोट्या बदलांमुळे तुमचं किचन अधिक मोकळं, स्वच्छ आणि वापरण्यास सोपं होऊ शकतं.