या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
रवी मुंडे, एबीपी माझा August 24, 2026 04:43 PM

Manoj Jarange Patil :  शिष्टमंडळ-किती दिवस चर्चा करणार आहे, सरकार चर्चा करतं आणि अवमान पण करतंय. तुम्हाला अजून मराठा समाजाकडून अपेक्षित काय आहे. 58 लाख नोंदी देणं सरकारचं कर्तव्य आहे. आम्ही मराठ्यांना (Maratha reservation) वेड्यात काढतो, हा सरकारचा गैरसमज आहे. शिष्टमंडळ आणि सरकारने गैरसमाजातून बाहेर पडावे, आता आम्ही वेळ देण्याच्या मनस्थितीत नाही. शिष्टमंडळ काय चर्चा करणार आहे. मराठ्यांचा रोष यांना कमी करायचा आहे. मराठ्यांच्या पुढे आता सरकार उघडं पडलं आहे, आता त्यांना सुट्टी नाही. 29 ऑगस्टला आंदोलन करणार असल्याचे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. अंतरवालीच्या (Antarwali Sarati) आंदोलनात सरकारने डाव टाकला, पण आता 29 ऑगस्टच्या आंदोलनात तसं केलं तर पुढचं आंदोलन मुंबई, वर्षा बंगल्यावर आहे. फडणवीस यांना विरोध करणार नाहीत. त्यांना खोलीत अडचण होत असली तर स्लॅबवर बसून आंदोलन करू, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange on Chhagan Bhujbal: छगन भुजबळ म्हातारपणात शहाणे झाले, त्यांना एवढं हसताना महाराष्ट्राने कधी बघितलं नाही

आमचं पहिल्यापासून तेच म्हणणं होतं की, 32 टक्के आरक्षणातून आम्ही आरक्षण मागितल तर त्यांनी म्हणावं. विनाकारण मराठ्यांशी वाद करून फायदा नाही, बरं झालं छगन भुजबळ म्हातारपणात शहाणे झाले. आता ते चांगले हसताय. त्याला एवढं हसताना महाराष्ट्राने कधी बघितलं नाही, अशी बोचरी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर केली आहे. तर, तुमच्या डोक्यातला खटका सुरु आहे. तुम्ही कोणत्या ओबीसींच कल्याण होऊ दिलं? आरक्षणात कोणता ओबीसी मोठा झाला आहे? पोळी भाजण्यासाठी हे नेत्यांच्या दारात फिरतात. ओबीसींनाही हे मान्य नाही. असं म्हणत मनोज जरंगे पाटील यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंवर टीका केली आहे.

Manoj Jarange Patil : नोंदी सापडल्या आहेत, आता सरकारच्या बापालाही आरक्षण द्यावं लागेल

दरम्यान, माझं ओबीसी नेत्यांना आव्हान आहे. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. मराठ्यांच्या नादाला लागून तुमचं राजकीय करियर उध्वस्त करू नका. तुम्ही मंत्री-आमदार झाल्यानंतर मराठयांच्या विरोधात काम करता. तुम्ही मराठा-कुणबीच्या नादाला लागायच नाही, अन्यथा तुम्हाला कांड्यावर मोजण्याइतकं देखील ठेवणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. नोंदी सापडल्या आहेत, आता सरकारच्या बापालाही आरक्षण द्यावं लागेल

सगळ्या जाती-धर्मातील बांधवाना सांगतोय, याच साठ झालं, त्याच फाठ झालं या भानगडीत पडू नका. यांचं राजकिय आरक्षण संपलं, त्याच राजकीय आरक्षण संपलं. हे काय घेऊन बसलाय? राजकारणात मराठे आणि धनगर काय मोठे होणार? तुम्ही विकत भांडण घेतल्यानंतर काय मराठे आणि धनगर तुमच्यात येतील? धनगरांनी उगाच विकतच्या भांडणात पडू नये. पदासाठी हे रोज राजकारणाच्या रानात आहेत. राजकारणापेक्षा शिक्षणानं मराठा-धनगरांचं भलं होणार आहे. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : सरकारने डाव टाकला तर मुंबई, वर्षा आपल्या सगळ्यांची आहे

छगन भुजबळ हे आता सगळे दात दिसतील एवढं हसतात. भुजबळ यांना आता कायदा कळतो. त्याला सगळं कळतं. मराठ्यांना धरून राहण्यात काय हरकत आहे. 29 ऑगस्टच्या अंतरवाली आंदोलनात पण सरकारने डाव टाकला तर मुंबई, वर्षा आपल्या सगळ्यांची आहे. फडणवीस विरोध करणार नाहीत. त्यांना खोलीत अडचण होत असतील तर स्लॅबवर बसून आंदोलन करेल. मराठा किती दिवस वेड्यात निघेल. मराठ्यांचा नोंदी देऊन सन्मान करणं सरकारचे काम आहे. नाही दिल्या तर सरकारला आम्ही नीट करू शकतो. राज्यात कुणीही खुष नाही. आम्ही सरकारला नीट करणार असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Maratha reservation: मराठे 100 टक्के जिंकणार अन्यथा मी उपोषण करून मरणार

मी प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी काम करतो. मराठा समाज मला उघडं पडू देत नाही. जोपर्यंत आंदोलन राहील तोपर्यंत मराठे इथे येतील. मागण्या मान्य केल्या तर ठीक अन्यथा आम्ही सरकारची मस्ती उतरवणार आहे. तुम्ही जी मजा घेतली 3 वर्ष त्यामुळे तुम्हाला सोडणार नाही. सगळे नीट करतो आणि सरकरला देखील नीट करतो. आश्वासन ऐकून कंटाळा आला आहे. 28 ऑगस्टपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. सरकारने गैरसमजाच्या बाहेर या. समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. या लढाईत मराठे 100 टक्के जिंकणार अन्यथा मी उपोषण करून मरणार. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.