
गरोदरपणाच्या काळात महिलांना अचानक विशिष्ट पदार्थ जसे की आंबट, तिखट किंवा गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. ज्याला आपण डोहाळे लागणे असे म्हणतो. पण हे डोहाळे लागणे म्हणजे केवळ मनःस्थितीतील बदल नसून शरीरात घडणाऱ्या मोठ्या हार्मोनल आणि शारीरिक घडामोडींचा एक भाग असतो. जाणून घेऊयात गरोदरपणात डोहाळे लागण्यामागील कारणं
हार्मोन्समधील बदल
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या पातळीत वेगाने चढ-उतार होतात. यामुळे स्त्रीच्या जिभेची चव आणि वासाची जाणीव तीव्रतेने बदलते. ज्यामुळे तिला वेगवेगळे पदार्थं खावेसे वाटतात.
पोषक तत्वांची कमतरता
शरीराला ज्या पोषक घटकांची गरज असते, त्या घटकांशी संबंधित पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. उदा. शरीरात आयर्न, कॅल्शियम किंवा सोडियमची कमतरता असल्यास विशिष्ट चवीचे पदार्थ खावेसे वाटतात.
वासाची संवेदनशीलता
महिलेला गरोदरपणात वासाची जाणीव खूप लवकर होते. यामध्ये काही पदार्थांचा वास नकोसा वाटतो, तर काहींचा वास तीव्रतेने आकर्षित करतो.
भावनिक बदल
गरोदरपणात होणाऱ्या शारीरिक त्रासामुळे आणि मूड स्विंग्समुळे अनेकदा कम्फर्ट फूड खाण्याची इच्छा वाढते. कम्फर्ट फूड म्हणजे असे पदार्थ जे खाल्ल्यावर आनंद होतो. मूड बदलतो.
मातेचा आनंद
आपल्या संस्कृतीत डोहाळे लागणे म्हणजे होणाऱ्या आईचे आणि बाळाचे लाड पुरवण्याचा काळ. सातव्या महिन्यात यासाठी डोहाळे जेवण हा समारंभही केला जातो. यामुळे आईला मानसिक आनंद मिळतो, जो तिच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम असतो.
काय काळजी घ्यावी?
डोहाळे पूर्ण करणे नैसर्गिक असले तरी अतिप्रमाणात जंक फूड, जास्त तिखट पदार्थ खाणे टाळावे. माती, खडू किंवा कागद खाण्याची इच्छा झाल्यास ही शरीरातील न्यूट्रिशनच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हेही पाहा –