SIP चा Rule 40 नेमका काय? कितव्या वर्षी कोट्यधीश होण्याची संधी?  जाणून घ्या समीकरण
जगदीश ढोले August 24, 2026 11:43 PM

SIP Rule-40 News  नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. आता गाव खेड्यातील युवक, नागरिक, महिला देखील म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करु लागले आहेत. एखाद्या गुंतवणूकदारानं कमी वयात गुंतवणूक सुरु केल्यास आणि ती दीर्घकाळ सुरु ठेवल्यास तो लवकर कोट्यधीश होऊ शकतो. त्याला SIP च्या Rule-40 चा पर्याय चांगला ठरु शकतो. या नियमामध्ये गुंतवणूकदारानं प्रत्येक वर्षी एसआयपीची रक्कम 10 टक्क्यांनी वाढवणं अपेक्षित असतं. 12 टक्के सीएजीआरनं परतावा अपेक्षित धरल्यास वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत 2 कोटींचा फंड तयार होऊ शकतो. 

SIP चा Rule-40 नियम काय?

कमी वय असताना एसआयपी सुरु करणं फायदेशीर ठरु शकतं. याची सुरुवात तुम्ही एक निश्चित रक्कम दरमहा SIP म्हणून भरु शकता. प्रत्येक वर्षी गेल्या वर्षीच्या एसआयपीच्या रकमेत 10 टक्के वाढ केली पाहिजे. म्हणजेच कमाई जशी वाढेल तशी गुंतवणूक देखील वाढवली पाहिजे.  एसआयपीवर 12 टक्के सीएजीआरनुसार परतावा मिळणं अपेक्षित असतं. जितक्या लवकर एसआयपी  सुरु केली जाईल, तितकी सुरुवातीची रक्कम कमी असेल.  

21 ते 25 वयादरम्यान SIP किती असावी?

एक उदाहरण म्हणून वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत 2 कोटींचा फंड तयार करण्याचा उद्देश असेल तर त्यानुसार वयाच्या कोणत्या वर्षी किती रकमेची एसआयपी करावी लागेल हे जाणून घेऊयात. 

21 वर्षे: 11,796 रुपये दरमहा
22 वर्षे: 13,875 रुपये दरमहा
23 वर्षे: 16,370 रुपये दरमहा
24 वर्षे: 19,379 रुपये दरमहा
25 वर्षे: 23,031 रुपये दरमहा

म्हणजेच एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्यास जितका उशीर होतो त्यानुसार एसआयपी सुरु करताना अधिक रकमेची गुंतवणूक करावी लागते. 21 वर्ष वय असताना गुंतवणूक सुरु केल्यास आणि 19 वर्ष सुरु ठेवल्यास गुंतवणुकीची रक्कम 72.42 लाख रुपये होते. तर, 12 टक्के सीएजीआर आणि 10 टक्के स्टेप अपच्या हिशोबानं परतावा आणि गुंतवणूक याचा विचार केल्यास 2 कोटींचा फंड तयार होतो. म्हणजे 72.42 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.28 कोटींचा रिटर्न मिळेल.  

 जे लोक  करिअरची सुरुवात करतात आणि भविष्यात उत्पन्न वाढण्याची आशा ठेवतात, त्यांच्यासाठी एसआयपीची Rule-40 उपयोगी ठरु शकतो. जे सुरुवातीला मोठ्या रकमेची गुंतवणूक करु शकत नाहीत ते दर वर्षी एसआयपीची रक्कम थोडी थोडी वाढवू शकतात. ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करुन परतावा मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी हा नियम चांगला आहे.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.