Tharla Tar Mag: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag)दिवसेंदिवस अधिक उत्कंठावर्धक वळण घेत आहे. ऐन डोहाळजेवणाच्या कार्यक्रमातून सायलीला झालेली अटक, त्यानंतर अर्जुनवर झालेला जीवघेणा हल्ला आणि सायलीची केस आता कोण लढणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये आता मालिकेत एक नवा आणि दमदार ट्विस्ट येणार आहे. अर्जुनच्या मदतीने सायली आता स्वतःच तिची कायदेशीर लढाई लढताना दिसणार आहे.
स्त्रीने लढायचं ठरवलं तर तिच्यात दहा हत्तींचं बळ संचारतं, हेच सायलीच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्वतःवर आलेल्या संकटांना घाबरून न जाता सायली खंबीरपणे त्यांचा सामना करणार आहे. इतकंच नाही तर आपल्या बाळालाही रडायचं नाही, तर संकटांशी कसं धैर्याने लढायचं, याचे संस्कार ती देताना दिसणार आहे.
मालिकेतील या मोठ्या बदलासोबतच सायलीचा नवा लूकही सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. नेहमीच्या पारंपरिक अंदाजात दिसणारी सायली आता अधिक मॉडर्न आणि आत्मविश्वासपूर्ण रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिच्या या नव्या लूकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, सायलीच्या व्यक्तिरेखेत झालेला हा बदल केवळ तिच्या कपड्यांपुरता किंवा लूकपुरता मर्यादित नसणार आहे. तिच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि आत्मविश्वासातही मोठा बदल पाहायला मिळणार आहे. संकटात सापडलेली सायली आता स्वतःसाठी आणि आपल्या बाळासाठी खंबीरपणे उभी राहताना दिसणार आहे.
सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीही या नव्या अंदाजामुळे खूप उत्साही आहे. बऱ्याच दिवसांनंतर मॉडर्न लूकमध्ये वावरण्याची संधी मिळत असल्याने जुईसाठीही हा बदल खास ठरला आहे. सायलीच्या व्यक्तिरेखेला मिळालेला हा नवा अंदाज आणि तिच्यात आलेला आत्मविश्वास साकारताना जुईला वेगळाच अनुभव येतोय. सायलीचा हा नवा प्रवास ‘ठरलं तर मग’मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.आता सायली या कायदेशीर लढाईत कशी बाजी मारणार? अर्जुन तिची साथ कशी देणार? आणि या सगळ्या संकटातून सायली आणि तिचं बाळ सुखरूप बाहेर पडणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. तेव्हा न चुकता पाहा ‘ठरलं तर मग’, रात्री 8.30 वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.