Celebrities Celebrate Raksha Bandhan: मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या ‘सन मराठी’ (Sun Marathi) वाहिनीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपलीये. याच भावनेतून राखी पर्णिमेच्या निमित्ताने ‘सन मराठी’च्या कलाकारांनी परळ येथील श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेला भेट दिली. मुलांसोबत वेळ घालवत, गप्पा मारत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत कलाकारांनी हा राखी पौर्णिमेचा सण खास साजरा केला. यावेळी ‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेतील अनुप्रिया म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकर. ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेतील समीर-अर्पिता म्हणजेच अभिनेत्री (Entertainment) योगिता चव्हाण आणि अभिनेता अंबर गणपुले, तसेच ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ मालिकेतील वृंदा-मोहन म्हणजेच अभिनेत्री स्वाती भिंगारदिवे आणि अभिनेता संग्राम समेळ उपस्थित होते.
या राखी पौर्णीमाचा सर्वात खास क्षण म्हणजे विशेष मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या. त्यांनी राख्या कलाकारांना प्रेमाने बांधल्या, कलाकारांनी त्यांना भेटवस्तू देत त्यांचा दिवस खास बनवला. या सुंदर क्षणाने कलाकारही भावूक झाले होते. त्यांनी मुलांच्या कलेचे आणि मेहनतीचे मनापासून कौतुक केले. तसेच त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण साजरे केले.
ही अनोखी राखी पौर्णिमा पाहून अभिनेत्री योगिता चव्हाण भावूक झाली. अभिनेत्री म्हणाली की, “आपण आजकाल एका अशा जगात राहतोय, जिथे अनेक गोष्टी खऱ्या असण्यापेक्षा दाखवण्यासाठी केल्या जातात. त्यामुळे मनापासून व्यक्त होणाऱ्या, कोणताही स्वार्थ नसलेल्या आणि अगदी निखळ अशा इमोशन्सची आपल्याला फारशी सवय राहिलेली नाही. या मुलांना भेटल्यानंतर मात्र काही क्षणांसाठी हे सगळं विसरून त्यांच्यासोबत खूप सुंदर आणि मनापासूनचे क्षण अनुभवता आले. त्यांच्यासोबत वेळ घालवताना जाणवलं की, आनंद मिळवण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खरा आनंद दडलेला असतो. त्यांच्या निरागसपणाने आणि प्रेमाने मनाला खूप स्पर्श केला."
यापुढे योगिता चव्हाण म्हणाली की, "या मुलांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत हे काही क्षण घालवण्याची संधी मिळाली, यासाठी देवाचे आणि सन मराठीच्या टीमचे मी मनापासून आभार मानते. आम्हाला आनंद झाला की नाही, यापेक्षा आमच्या येण्याने या मुलांना किती आनंद झाला असेल, त्यांच्या चेहऱ्यावर काही वेळासाठी का होईना, पण हसू आलं असेल, हा विचारच आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून आम्हाला मिळालेलं समाधान शब्दांत सांगणं खरंच कठीण आहे. कदाचित आमच्यासाठी हा फक्त काही तासांचा अनुभव असेल, पण आमच्या या छोट्याशा भेटीने त्यांच्या आयुष्यातला एखादा सुंदर क्षण तयार झाला असेल, तर त्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी दुसरी कोणतीच नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या:
आशा ताईंच्या निधनानंतर रिलीज होणार त्यांचं शेवटचं गाणं, 2023 साली झालं रेकॉर्ड, अभिनेता भावुक