मराठी शिकण्यासाठी रिक्षा चालकांना एका वर्षाची मुदतवाढ, तोपर्यंत कारवाई होणार नाही; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
एबीपी माझा ब्युरो August 27, 2026 08:43 PM

मुंबई : अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या दरम्यान, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आतापर्यंत मराठी बोलता येत नसलेल्या रिक्षाचालकांवर त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येत होती. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नव्या घोषणेमुळे या रिक्षाचालकांना अभय मिळण्याची शक्यता आहे. 

अमराठी रिक्षा चालकांच्या एका समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. 

मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

मुख्यमंत्री म्हणाले की, "मुंबईचे ऑटो चालक आणि रिक्षा चालकांनी भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये जुजबी मराठी का होईना ते आलंच पाहिजे आणि ते शिकण्याचा ते प्रयत्न करत आहेत. भविष्यातही ते प्रयत्न सुरूच असतील. मात्र वेगवेगळ्या वयोगटातील टॅक्सी चालकाना एवढ्या कमी वयात मराठी शिकणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ देण्यात येत आहे. या दरम्यान त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. या काळात त्यांनी जुजबी मराठी शिकावं. समोरून येऊन त्यांनी ही वेळ मागितल्याने  त्यांना वेळ देणं गरजेचं होतं."

MPSC परीक्षा पारदर्शी होणार 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एमपीएससीच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शी झाल्या पाहिजेत. औषध निरीक्षक परीक्षेच्या बाबतीत पेपर अनेकांकडे गेला यात तथ्य नाही. तो पेपर फक्त एका व्यक्तीकडे गेला आहे. असं असलं तरी एमपीएससीने पूर्ण परीक्षा रद्द केली आहे. एमपीएससी परीक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही एक समिती नेमली आहे. यापुढच्या परीक्षा या पारदर्शक व्हाव्यात, कोणतेही गैरप्रकार होणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल. हे होत असताना काही लोक फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते योग्य नाही. विनाकारण राजकारण करू नका. राज्य सरकारने मनावर घेतलं असून पुढच्या परीक्षा या पारदर्शी व्हाव्यात यासाठी प्रयत्न करू."

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.