मुख्यमंत्र्यांचा निर्णय आमच्यासाठी बंधनकारक, रिक्षा चालकांनी आता एका वर्षात मराठी शिकावं : प्रताप सरनाईक
एबीपी माझा ब्युरो August 27, 2026 10:43 PM

मुंबई : अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर त्यावर आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी अमराठी रिक्षा चालकांना एक वर्षाची मुदत दिली असेल तर तो निर्णय आमच्यासाठी बंधनकारक आहे. या एका वर्षामध्ये आता सर्वांनी मराठी शिकावं, त्यांनतर मुदतवाद मिळणार नाही, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. 

मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी वेळ मागितला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी चालकांना एका वर्षाची मुदतवाढ दिली. या दरम्यान रिक्षा आणि ट्रक्सी चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात राहायचं असेल, इथे व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येकाला जुजबी मराठी शिकणं आवश्यक आहे. 

प्रताप सरनाईक म्हणाले की, "नोटीस दिल्यानंतर एक महिन्याच्या आत मराठी शिकावं असा नियम होता. जर मराठी बोलता आलं नाही तर तीन महिन्यापर्यंत परवाना रद्द व्हायचा. या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये चालकाने जुजबी मराठी शिकावी अशी अपेक्षा होती. परंतु आता मुख्यमंत्र्यांनीच जर एक वर्षाची मुदत दिली असेल तर ते त्यांनी शिकावं. मुख्यमंत्री हे सर्वोच्च नेते आहेत. त्यांना सर्वाधिकार आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी बंधनकारक आहे."

मराठी शिकण्याचा आणि बोलण्याचा नियम हा 1989 सालचा हा नियम आहे. आम्ही आतापर्यंत 36 वर्षे थांबलो, मग अजून एक वर्ष थांबायला लागलं तरी काही हरकत नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले. 

उपमुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं?

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आतापर्यंत 1 लाख 60 हजार अमराठी चालकांनी जुजबी मराठी शिकली. त्यापैकी 20 ते 30 हजार लोकांनी कांदिवलीतील कार्यक्रमात मराठी भाषा शिकल्याचं प्रमाणपत्र घेतलं. मराठी भाषा ही आपल्या व्यवहारामध्ये प्रत्येकाला आली पाहिजे अशी भूमिका परिवहन खात्याने घेतली. त्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेऊन मराठी शिकली त्यांचे मी अभिनंदन करतो. मराठीचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये होतोय याचा अभिमान वाटतोय. मुख्यमंत्र्यांनी आता मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.