“निवडणूक आयोग निष्पक्ष नाही”, संजय राऊतांचा गंभीर आरोप, भाजपला ओपन चॅलेंज देत म्हणाले “हिंमत असेल तर..”
GH News September 16, 2024 04:10 PM

Sanjay raut on Election Commission : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच नेते सज्ज झाले आहे. अनेक पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या लोकांची सोय पाहून निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा, टप्पे याबद्दल घोषणा करते. जर तुमच्या हिंमत असेल तर निवडणूक जाहीर करा, असे चॅलेंज संजय राऊतांनी दिले आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. “देशाचे निवडणूक आयोग हे स्वतंत्र आणि निष्पक्ष नाही. भाजपच्या लोकांची सोय पाहून निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा, टप्पे याबद्दल घोषणा करते. मग लोकसभा असू दे किंवा विधानसभा…, महाराष्ट्रातील १४ महापालिकांच्या निवडणूक अद्याप झालेल्या नाहीत. कारण भाजप आणि त्यांच्या सोबत असलेले लोक या निवडणुका हरतील, त्यामुळे निवडणुका होत नाहीत. जर तुमच्या हिंमत असेल तर निवडणूक जाहीर करा”, असे संजय राऊत म्हणाले.

“हा सर्व भोंगळ कारभार”

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्राचीही राजधानी आहे. तरीही मुंबई महापालिकांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत नगरसेवक किंवा इतर कोणीही लोकप्रतिनिधी नाही. अशा १४ प्रमुख महापालिकांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत आणि त्यात मुख्यमंत्री सांगतात की या तारखेला निवडणुका होणार. एकीकडे आम्हाला कोर्टाकडून तारीख मिळत आहे आणि इथे मुख्यमंत्री तारखा देत आहेत. हा सर्व भोंगळ कारभार आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“मुख्यमंत्री यांनी निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का?”

निवडणुका तेव्हाच होतील जेव्हा त्यांना विश्वास पटेल की आता आपण काहीतरी करु शकतो. सध्या आपण लोकशाहीच्या अशा टप्प्यावर आहोत, जिथे निवडणूक आयोगावरच यांनी नियंत्रण मिळवले आहे. महाराष्ट्रात लोकसभेत काय झालं, तेच आता विधानसभेतही होणार आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्‍यांना सांगेन की तुम्ही तारखा द्या, पण ज्या तारखेला निवडणूक होईल, त्या तारखेपासून तुम्ही घरी जाल. मुख्यमंत्री यांनी निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळला आहे का? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

“ही देशासाठी धोक्याची घंटा”

न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल हे आधीच मुख्यमंत्री सांगतात. तो निकाल कसा तुमच्या बाजूने लागेल हे याचीही माहिती आम्हाला समजली, जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य न्यायाधीशांकडे जातात, तर मग देशात काहीही होऊ शकते. शिवसेना आणि चिन्हे हे आपल्यालाच मिळेल जसे की निवडणूक आयोग यांच्या खिशामध्ये आहेत. निवडणूक आयोग सांगण्याआधी हे सांगत आहे या महिन्यात निवडणुका होतील म्हणून निवडणुका होणार म्हणून. या देशात जेवढ्या संविधानिक संस्था आहेत, त्या सर्व त्यांच्या खिशात आहेत आणि ही देशासाठी धोक्याची घंटा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.