Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत
Saam TV September 20, 2024 05:45 AM

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबई म्हाडाच्या 2024 मधील लॉटरीतील घरांसाठी अर्ज आणि अनामत रक्कम भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत रात्री बारा वाजेपर्यंत असून या मुदतीपूर्वी 2030 घरांसाठी रात्री 9 वाजे पर्यंत तब्बल एक लाख 31 हजार 108 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर एक लाख 8 हजार 194 नागरिकांनी अनामत रक्कम देखील जमा केली आहे.

मात्र अनामत रक्कम भरण्याची मुदत ही रात्री 11:59 पर्यंत असून या उर्वरित वेळेत अनामत रक्कम भरण्याची लगबग सुरू आहे. अनेकांनी कशीबशी पैशांची जुळवाजुळव करत शेवटच्या दिवशी अनामत रक्कम भरण्याचा प्रयत्न केला. परंतू, पेमेंट फेलचे मेसेज येऊन खात्यातून पैसे कट झाल्यामुळे आपला अर्ज जमा झालाय की नाही, आपण लाॅटरीपासून मुकणार का? असे प्रश्न शेकडो अर्जदारांना सतावत आहे.

Mumbai local train update : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि ट्रान्स हार्बरवर विशेष पॉवर ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

म्हाडाने मुंबईतील २०३० घरांसाठी सोडत जाहीर केली असून इच्छुकांना गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची आणि रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची मुदत होती. अर्जदारांच्या तक्रारीनंतर ऐनवेळी अर्ज तसेच अनामत रक्कम भरण्याची मुदत गुरुवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करण्यात आली. अनामत रक्कम ५० हजारांच्या घरात असल्यामुळे अनेकांनी शेवटच्या दिवशी पैसै भरणे पसंत केले. ऐनवेळी पैसे भरणे या अर्जदारांना चांगलेच महागात पडत असल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.

म्हाडाच्या संकेतस्थळावर अनामत रक्कम भरल्यानंतर पेमेंट फेलचे मेसेज अनेकांना आले. तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले गेले असतील तर एक ते दोन दिवसात अकाऊंटमध्ये परत येतील, असा मेसेज साईटवर झळकत होता.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

आधीच अर्जदारांनी कशीबशी पैशांची जुळवाजुळव करून म्हाडाचा फॉर्म भरला. त्यातच शेवटच्या दिवशी पेमेंट फेल होत अकाऊंटमधून पैसे कापले गेल्याने पुन्हा अनामत रक्कम भरण्यासाठी पैशांची जुळवाजुळव कशी करायची, अकाऊंटमधून कापलेले पैसे दोन दिवसांनी पुन्हा जमा झाले तर याचा अर्थ आपला अर्जच म्हाडाकडे सबमिट झाला नाही आणि यंदाही आपले घराचे स्वप्न अधुरे राहणार का, अशी चिंता अर्जदारांना भेडसावत आहे.

आतापर्यंत तब्बल एक लाख 31 हजार 108 अर्ज दाखल

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल एक लाख 31 हजार 108 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी एक लाख 8 हजार 194 नागरिकांनी अनामत रक्कम देखील जमा केली आहे. मात्र अनामत रक्कम भरण्याची मुदत ही रात्री 11:59 पर्यंत असून या उर्वरित वेळेत अनामत रक्कम भरण्याची लगबग आता सुरू आहे. मात्र अनेकांना अनामत रक्कम भरताना पेमेंट फेलचा फटका बसत आहे. यामुळे आपला अर्ज दाखल झाला आहे किंवा नाही? याबाबत अनेक अर्जदारांकडून शंका उपस्थित केली जात आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.