नांदेड लोकसभा कोण लढवणार?, काँग्रेसमधून नाव आलं समोर; निवडणूक बिनविरोध होणार?
GH News September 20, 2024 01:14 PM

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं नुकतंच निधन झालं. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबतच या जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे काँग्रेसने ही जागा लढवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. वसंत चव्हाण यांच्या मुलालाच लोकसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेते? भाजप उमेदवार देणार की नांदेड लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची याची काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे. दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. वसंत चव्हाण यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिल्यास मतदारांची सहानुभूती मिळू शकते. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा विजय होऊ शकतो, असा पक्षाच्या नेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे या जागेवर चर्चा करण्यासाठी आज मुंबईतील टिळक भवन येथे सकाळी 11 वाजता काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

रवींद्र चव्हाणच का?

वसंत चव्हाण यांच्या मुलाला रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास मतदारांची सहानुभूती मिळेल. त्यामुळे चव्हाण यांचा विजय सोपा जाईल. शिवाय रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास भाजपकडून कदाचित उमेदवार दिला जाणार नाही, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होऊ शकतो. तर चव्हाण यांच्या कुटुंबा व्यतिरिक्त पक्षातून इतर उमेदवार दिल्यास भाजपकडून नांदेडमध्ये उमेदवार दिला जाईल. शिवाय मतदारांची सहनुभूतीची लाट राहणार नाही. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसला जड जाऊ शकते, असं काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या सर्व गोष्टींचा आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते चर्चा करणार असून

भाजपला खिंडार?

दरम्यान, नांदेडमध्ये अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर चव्हाण त्यांचे मेव्हणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सूनबाई मीनल खतगावकर यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मीनल खतगावकर यांनी भाजपकडून नांदेड लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केली होती. मात्र पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मीनल खतगावकर यांनी विधानसभेसाठी अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा दिला होता. त्यातच त्यांनी मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते.

मात्र आता या सर्व गोष्टीला पूर्णविराम मिळणार असून आज मुंबई येथे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सुनबाई मीनल पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मीनल खतगावकर या नायगाव विधानसभेवर दावा करू शकतात, अशीही शक्यता आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि अविनाश घाटे पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर मुंबईत तळ ठोकून आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.