सायबर गुन्हेगारांनी रक्कम लंपास केल्यास 'या' 2 गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे पैसे परत मिळतील! सायबर पोलिसांचे प्रसंगावधान अन् न्यायाधीशांच्या पतीच्या ऑनलाइन तक्रारीनंतर 42 लाख मिळाले परत
esakal September 20, 2024 01:45 PM

सोलापूर : ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम एकदा लंपास झाली की ती परत मिळत नाही, असा समज आहे. मात्र, सोलापूर शहर सायबर पोलिसांनी एका न्यायाधीशांच्या पतीची शेअर मार्केटच्या नावाखाली लंपास केलेली तब्बल ४२ लाखांची रक्कम परत मिळवून दिली आहे. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी कारर्किदीतील संस्मरणीय गुन्हा असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

जून २०२४ मध्ये शेअर मार्केटमधून ज्यादा नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका न्यायाधीशांच्या पतीलाच ६२ लाखाला फसविले. त्यांनी आपले नाव उघड होणार नाही याची खबरदारी घेत, सायबर पोलिसांच्या १९३० या टोल फ्री क्रमांकावर ऑनलाइन तक्रार केली. फसवणूक झाल्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत, सोलापूर शहर सायबर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

न्यायालयाच्या माध्यमातून रक्कम होल्ड करण्याची परवानगी मिळवली. त्यानंतर आता रक्कम परत मिळणार नाही, असे समजून गप्प बसलेल्या त्या तक्रारदाराला अवघ्या दीड महिन्यात तब्बल ४२ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले. सायबर पोलिसांनी या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा शोध घेऊन दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यातील बॅंक खात्यातून ती रक्कम परत मिळविली हे विशेष.

ऑनलाइन तक्रारीनंतर ४२ लाखांची रक्कम परत मिळविण्यात यश

ऑनलाइनच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी तुमची रोकड लंपास केली असल्यास तत्काळ १९३० या टोल फ्री क्रमांकावर किंवा सायबर पोलिसांकडे संपर्क करून तक्रार करावी. जेणेकरून खात्यातून गेलेली रक्कम होल्ड करून परत मिळवता येते. या प्रकरणात देखील अशाच पद्धतीने केवळ ऑनलाइन तक्रारीवरून ४२ लाख रुपयांची रक्कम परत मिळवता आली.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर, सोलापूर शहर

रक्कम दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगालच्या खात्यात

सायबर गुन्हेगार रक्कम लंपास केल्यानंतर एका खात्यात ठेवत नाहीत. एका खात्यातून ते वेगवेगळ्या खात्यात रक्कम वर्ग करतात, जेणेकरून सायबर पोलिसांना ती रक्कम होल्ड करता येणार नाही हा हेतू असतो. एका न्यायाधीशांच्या पतीची लंपास केलेली रक्कम अशाच पद्धतीने दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगालच्या पाच खात्यात वर्ग केली होती. तरीपण, वेळेत तक्रार प्राप्त झाल्याने पोलिसांना ती रक्कम परत मिळविण्यात यश आले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.