'देशात सनातन धर्म संरक्षण बोर्डाची स्थापना करा', तिरुपती मंदिरातील लाडूच्या वादानंतर पवण कल्याण यांची मागणी
अपूर्वा जाधव September 20, 2024 07:43 PM

Pawan Kalyan on Tirupati Temple :   तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji Temple) तयार करण्यात येणाऱ्या लाडवाच्या प्रसादावरुन सध्या आंध्र प्रदेशासह संपूर्ण देशभरात वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या प्रसादाबाबत गंभीर आरोप केले. आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात या प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात होती, असं आरोप करण्यात आलाय. त्यावर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण (Pawan kalyan) यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.                 

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी देशात सनातन धर्म संरक्षण बोर्डाची स्थापना करण्याचीही मागणी केली आहे. त्यामुळे आता आंध्र प्रदेशात या वादाला चांगलच तोंड फुटलं असून याचे खोलवर परिणाम होत असल्याचं चित्र सध्या आहे. 

पवन कल्याण यांनी काय म्हटलं?

पवन कल्याण यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की, तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस चरबी) मिसळल्याच्या निष्कर्षांमुळे आपण सर्वजण व्यथित झालो आहोत. वायसीपी सरकारने स्थापन केलेल्या टीटीडी बोर्डाने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आमचे सरकार कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु, यामुळे मंदिरांची विटंबना, त्यांच्या जमिनीचे प्रश्न आणि इतर धार्मिक प्रथांशी संबंधित अनेक समस्यांवर प्रकाश पडतो.

पुढे त्यांनी म्हटलं की, संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आली आहे.राष्ट्रीय स्तरावर सर्व धोरणकर्ते, धर्मप्रमुख, न्यायव्यवस्था, नागरिक, प्रसारमाध्यमे आणि इतर सर्वांनी आपापल्या क्षेत्रात चर्चा केली पाहिजे.मला वाटतं की आपण सर्वांनी एकत्र येऊन ‘सनातना धर्माचा’ कोणत्याही प्रकारे होणारा अपमान थांबवला पाहिजे. 

ही बातमी वाचा : 

तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर? मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.