नसराल्लाहच्या युद्धाच्या घोषणेनंतर, हिजबुल्लाहचा इस्रायलवर हवाई हल्ला
GH News September 20, 2024 11:09 PM

Hezbollah Attack On Israel : गेल्या दोन दिवसांत लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह सैनिकांकडे असलेल्या पेजरचा स्फोट झाला. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये देखील स्फोट होऊ लागले. हिजबुल्लाहवर इस्रायलने केलेली ही मोठी कारवाई होती. ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर तीन हजार लोकं जखमी झाले. त्यानंतर हिजबुल्लाहच्या प्रमुखांनी इस्रायल विरोधात संघर्षाची घोषणा केली. इस्रायले सर्व सीमा ओलांडल्याचं त्यांनी म्हटले आहे. अल्जझीराच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाहने शुक्रवारी उत्तर इस्रायलवर 140 रॉकेट डागले आहेत. हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाह याने इस्रायलकडून बदला घेण्याची शपथ घेतल्याच्या एका दिवसानंतर हा हल्ला करण्यात आला आहे.

हिजबुल्लाहकडून हल्ला

इस्रायली लष्कर आणि दहशतवादी गटाने या घटनेची माहिती दिली. इस्त्रायली लष्कराने सांगितले की, शुक्रवारी दुपारी तीन वेळा इस्रायलवर रॉकेट डागण्यात आले. लेबनॉन सीमेला लागून असलेल्या भागांना लक्ष्य करण्यात आले. अल जझीराच्या अहवालानुसार, हिजबुल्लाहने सांगितले की, त्यांनी कात्युशा रॉकेटसह सीमेवरील अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आहे, ज्यात अनेक हवाई संरक्षण तळ आणि इस्त्रायली आर्मर्ड ब्रिगेडचे मुख्यालय आहे. ज्यावर त्यांनी हल्ला केला.

कोणतीही जीवितहानी नाही

हिजबुल्लाहने डागलेल्या रॉकेटमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं इस्रायली लष्कराने म्हटले आहे. IDF ने सांगितले की, आमच्या हवाई दलाने काही रॉकेट हाणून पाडले आहेत, तर काही रॉकेट हे मोकळ्या भागात पडले आहेत.” दक्षिण लेबनॉनमधील गावे आणि घरांवर इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे. हिजबुल्लाह प्रमुख नसराल्लाह यांनी गुरुवारी (19 सप्टेंबर) इस्रायलवर दररोज हल्ले सुरू ठेवण्याची शपथ घेतली. मात्र, गाझामध्ये युद्धविराम झाल्यास ते इस्रायलवरील हल्ले थांबवतील, असे हिजबुल्लाहने स्पष्टपणे सांगितले आहे.

बेरूतमध्ये पेजर आणि वायरलेस उपकरणांमध्ये (वॉकी-टॉकी) झालेल्या स्फोटांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता, त्यानंतर हिजबुल्ला प्रमुख लेबनॉनच्या लोकांना संबोधित करत होते. हिजबुल्लाह प्रमुखाचे भाषण संपताच इस्रायलने हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर पुन्हा हवाई हल्ले केले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.