मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
रवी मुंडे, एबीपी माझा September 21, 2024 01:43 PM

Maratha-OBC Reservation: मराठा आरक्षणाचे होमग्राऊंड अंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे शुक्रवारी मध्यरात्री मराठा ओबीसी आंदोलक आमनेसामने आले. शुक्रवारी पोलिसांनी काही मराठा आंदोलकांना अडवल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मराठा आणि ओबीसी आंदोलक एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात मध्यरात्री घोषणाबाजी झाल्याने परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून शुक्रवारी रात्रीही पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी होता. आजही अंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बॅरिकेट्स लावण्यात आले असून ओबीसी आंदोलन सुरु असणाऱ्या रस्त्यावर 14 पोलीस अधिकारी,60 पोलीस कर्मचारी एसआरपीच्या दोन व आसीपीची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

राज्यात मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न पुन्हा एकदा तापत असल्याचे दिसत असून जालन्यातील अंतरवली सराटीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांनी आंदोलकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. सध्या या परिसरात शांतता असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने

मराठा- ओबीसी आरक्षणप्रश्न चांगलाच तापत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे सगे सोयऱ्यांसह मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असून जालन्यातीलच वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतोच. शुक्रवारी मध्यरात्री मराठा आंदोलकांना अडवल्यानं या भागात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने आले. त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. परिस्थिती चिघळण्याची परिस्थिती दिसताच मध्यरात्री पोलिसांचा मोठा फौजफाटा या भागात दाखल झाला. आज सकाळीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त या भागात आहे. परिस्थिती नियंत्रणात असून  वडिगोद्री ते अंतरवली सराटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. 

किती फौजफाटा तैनात?

14 पोलीस अधिकारी,60 पोलीस कर्मचारी एसआरपीच्या दोन व आसीपीची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. या भागात ट्रॅफीकचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ट्रॅफीक पोलीस तसेच प्रशासनाचे काही वरिष्ठ अधिकारीही असल्याचं सांगण्यात आलंय. आज परिस्थिती नियंत्रणात असून मराठा ओबीसी समाजाला सहकार्याचं आवाहन करण्यात आलंय. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळपासून दरारोजचा बंदोबस्त लावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.