पत्नीच्या दुकानातून केलेली ग्रामपंचायतीची खरेदी भोवली
esakal September 22, 2024 12:45 AM

मोरगाव, ता. १९ : तरडोली (ता. बारामती) ग्रामपंचायतीचे सदस्य नवनाथ जगदाळे यांनी सरपंच असताना आर्थिक हितसंबंध जोपासल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने त्यांना १० सप्टेंबर रोजी पुन्हा अपात्र ठरवले आहे.
नवनाथ जगदाळे हे सन २०२१मध्ये सरपंचपदावर कार्यरत असताना त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांची पत्नी चालवत असलेल्या स्वतःच्या दुकानातून गणवेश खरेदी केला होता. ग्रामपंचायत पदाधिकारीपदी कार्यरत असताना त्यांनी ‘शुभम साडी डेपो’ या दुकानातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चेक क्र. ५००५४०अन्वये ११ हजार ९५० रुपयांचे गणवेश खरेदी करून पत्नीच्या नावे चेक काढला होता. तर, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी श्रीकांत गाडे यांचे पती श्रीकांत दत्तात्रेय गाडे यांच्या नावे कोरोना काळात टाकी साफ करणे, वृक्ष लागवड व इतर किरकोळ कामाचे ५४०० रुपयांचा चेक काढला होता. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य विद्या हनुमंत भापकर, संतोष संपत चौधरी, स्वाती सतीश गायकवाड यांनी गटविकास अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जगदाळे व गाडे यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करावे, असा अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीनंतर त्यांचे पद रद्द केले होते.
दरम्यान, जगदाळे व गाडे यांनी या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल रद्द करत जगदाळे व गाडे यांना पात्र केल्याचा आदेश दिला होता. या आदेशाने व्यथित होऊन विद्या भापकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यामध्ये उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाला फेरबाजू मांडण्याची संधी द्यावी व फेरचौकशी करून निकाल द्यावा, असा आदेश १५ डिसेंबर २०२३ रोजी दिला होता. त्यानुसार पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरु असलेल्या दाव्याचा निकाल आदेश पारित केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोघांना बाजू मांडण्याची संधी दिली. त्यावर निकाल देताना जगदाळे यांच्या ‘शुभम साडी डेपो’ या दुकानातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश खरेदी केली असून, हे साडी सेंटर नवनाथ व त्यांच्या पत्नी चालवत असल्याने ग्रामपंचायत अधिनियम १९५९चे कलम १४ ग हे कारण पुढे करीत ते कारवाईस पात्र आहेत, असा आदेश दिला. त्यानुसार नवनाथ जगदाळे यांना ग्रामपंचायत सदस्यपदावरून अपात्र केले. तर, कोरोना काळात अश्विनी गाडे यांचे पती श्रीकांत दत्तात्रेय गाडे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे चेक काढले असल्याने त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवत त्यांच्यावर असणारे अपात्रतेची टांगती तलवार बाजूला झाली. मात्र, जगदाळे यांना ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक हितसंबंध ठेवल्यामुळे अपात्र ठरवले.
अर्जदार विद्या भापकर यांच्यावतीने ॲड. हेमंत भांड पाटील यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, यासंदर्भात नवनाथ जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची त्यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.