ताजमहाल
esakal September 22, 2024 09:45 AM

- हृदयनाथ मंगेशकर

विख्यात गायिका दिवंगत लता मंगेशकर यांचा येत्या २८ रोजी पंचाण्णवावा जन्मदिन आहे. त्यानिमित्त हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या भगिनीच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...

दीदी शांत बसली होती. कसल्या तरी विचारात होती. वीणेची तार सुरात मिळवताना देवी सरस्वती कशी दिसली असेल, दीदी तशीच दिसत होती! देवीचे व्रण थोडेफार दिसत आहेत. सावळा; पण आंतरिक तेज असलेला वर्ण.

थोडं मोठं नाक, देवीमुळं किंचित आकार गमावून बसलेलं; पण तिला शोभणारं. त्याखाली सुबक, लहान ओठ. खालचा ओठ किंचित् जाड. त्याच्याखाली, तोंड उघडताच हिऱ्यासारखे चमकणारे दात अत्यंत सुबक.

ईश्वरानं फार विचारपूर्वक जिवणी ओठ, दात दीदीला दिले होते. गाताना ती तोंड उघडायची तो आकार निसर्गानं इतका बरोबर दिला होता की दीदीचा ‘आकार’ हा आकारच ऐकू यायचा. आकारात इतर कुठलंही व्यंजन ऐकू यायचं नाही.

आकार, मकार, उकार हे उच्चार इतके सुबक असायचे की व्यंजनं एकमेकांत मिसळायची नाहीत. हे वाचायला सोपं आहे; पण यावर विचार केला तर कुणी इकारात गातं, तर कुणी आकार लावताना ‘अॅ’चा आवाज लावतं.

काही गाणाऱ्या गायिकांच्या चेहऱ्याची ठेवण अशी असते की त्यांना आकार लावताच येत नाही, त्यांचं तोंड हवं तेवढं उघडतच नाही.काही गायिकांचं तोंड जास्तच उघडलं जातं. त्यातून शब्दोच्चार स्वच्छ होऊच शकत नाहीत, काही गायिकांचं तोंड नाजूकपणे उघडलं जातं, त्यातून आकारयुक्त तान, शब्द अस्पष्टपणे ऐकू येतात.

गाताना सगळी व्यंजनं, वक्र सूर ऐकू येण्यासाठी उघडलेला चेहरा फार योग्य हवा. सुंदर मुखातून सुंदर सूर, शब्द नेटके निघतील असं मुळीच नाही. अतिशय मापात उघडणारं तोंड निसर्गाकडून मिळणं याला भाग्य लागतं. गाताना दीदीचं तोंड अगदी मापात उघडायचं. सुराबरोबर अकार, उकार, मकार हे अगदी चपखलपणे शब्दात अडकायचे.

त्यामुळं कुठंही रसभंग व्हायचा नाही. दीदीचा कुठलाही सूर नाकात जायचा नाही. ज्याला ‘नेझल’ असं म्हटलं जातं तो कोकणी स्वर दीदी कधीही लावायची नाही. उर्दूतले काही उच्चार नाकात करावे लागतात, ते उच्चार दीदी सहज करायची. काहींचे दात लहान असून, अगदी ओळीत असतात. अशा दातांना जीभ नीट लागत नाही.

त्यामुळं प्रत्येक उच्चार करताना जोर द्यावा लागतो. परिणामी, गाण्यातली सहजता नष्ट होते. काहींचे दात फार मोठे असतात, त्यामुळं उच्चार करताना जीभ कुठंही लागते. शब्दोच्चार अस्पष्ट, अडखळल्यासारखे वाटतात.

दात खूप पुढं असले तर दाताला जीभ लवकर न लागल्यामुळं प्रत्येक उच्चार फसफशीत होतो. दात मापात असणं, तोंड उघडताना ते प्रमाणबद्ध असणं या सर्व देणग्या निसर्गानं दीदीला दोन्ही हातांनी दिल्या होत्या. त्यामुळं गाताना दीदी सुंदर दिसायची. दीदीचं तोंड मापात उघडलं जायचं. ओठ जाड नव्हते, फार पातळही नव्हते. त्यामुळं तिचे उच्चार स्वच्छ; पण रुक्ष नव्हते.

स्वच्छ उच्चार म्हणजे प्रत्येक शब्द चावून उच्चार करायचा, असे काही गायक-गायिका आहेत. कानाला हे उच्चार कृत्रिम, कठोर वाटतात. दीदीनं असे उच्चार कधीही केले नाहीत. त्यामुळं तिचा प्रत्येक सूर, प्रत्येक शब्द हा सोनियाचा वाटतो.

दीदीचा प्रत्येक सूर, प्रत्येक शब्द ही एक शाळा आहे. प्रत्येक गाणं हे विद्यालय आहे. भजन, विराणी, विरहगीत हे महाविद्यालय आहे. आणि गात असताना, गात नसताना मनाची जी कोमल, करुणामय, दयार्द्र अवस्था तिला प्राप्त होते ती अवस्था हे एक विद्यापीठ आहे.

हां! तर दीदी शांत बसली होती. खर्जातून न उमटणाऱ्या ‘गंधारा’सारखी...फुलातून न वाहणाऱ्या ‘सुगंधा’सारखी...भजनातून न झरणाऱ्या ‘भक्ती’सारखी...मनातून न उठणाऱ्या ‘हुंकारा’सारखी... शांत दीदी किती सुंदर दिसायची हे फक्त दीदीची शांतस्रय, श्रांतस्रय, विघटतस्रय, विमनस्कस्रय अवस्थाच सांगू शकेल.

मी दीदीला विचारलं :

‘‘कसल्या विचारात आहेस?’’

दीदी मनापासून हसली, फार छान. निर्मळ, निष्पाप, निरागस शब्दांचं

साम्राज्य जिथं संपतं, असं शब्दातीत हसायची ती.

‘‘फार काही नाही; पण कंटाळा आला आहे रे! तेच स्टुडिओ, ते कवी,

ते संगीतकार, ती गाणी, ते वादक, ते चाहते, सर्व काही तेच ते. फार कंटाळा आला आहे.’’

मी हसलो; मग म्हणालो : ‘‘दीदी, सोपा उपाय आहे...

बाहेरगावी जा, तेही महाराष्ट्राबाहेर; कारण, महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव तू

बघितलं आहेस. कुठं तरी वेगळ्या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर जा.’’

‘‘जा नाही. ‘जाऊ या’ म्हण. मी एकटी थोडीच जाणार? उषा, तू अन् मी...पण कुठं जाऊ या? काही सुचत नाही रे! ए उषाऽऽ, कुठं जाऊ या?’’

मी, दीदी, उषाताई विचारात पडलो.

संगीत आणि काम यापलीकडं काही जग असतं, हे आम्ही विसरलो होतो.फार लहान वयात आम्ही कामाला लागलो होतो. मी वयाच्या बाराव्या वर्षापासून कार्यक्रम, गाणं शिकणं-शिकवणं, लेखन करून देणं असं करत होतो. उषाताईही माझ्याबरोबर काम करू लागली होती.

अतिशय कष्टानं काम मिळायचं. प्रवास वगैरे फार कष्टात करावे लागायचे.‘तुम्ही मंगेशकर...तुम्हाला कामाची काय आवश्यकता?’

हे वाक्य ऐकून ऐकून आता आमच्या सरावाचं झालं होतं.

आम्ही लहान वयात कष्ट करतो, याचा दीदीला फार त्रास व्हायचा; पण आई फार स्वाभिमानी. आम्ही बसून खाल्लेलं तिला आवडायचं नाही. ‘महिना दीडशे-दोनशे रुपये तरी घरी कमावून

आणा; मगच जेवा...स्वतःचे कपडे स्वतः शिवा...लताच्या गाडीत बसू नका...गाडी विकत घेण्याएवढे कष्ट करा...विद्या कमवा...स्वाभिमानानं जगा...’ असं ती सांगत असे.

आम्हीपण तिचीच मुलं. तिचं म्हणणं आम्हाला पटायचं; पण आम्ही काम करतो, कार्यक्रम करतो हे दीदीला बिलकूल आवडायचं नाही.

मला आणि उषाताईला ती विरोध करायची; पण आपलं मत आमच्यावर कधीही लादायची नाही. आम्ही काम करतो हे तिला जरी आवडलं नाही तरी, आम्ही काम करतो याचा तिला फार अभिमान होता. मनातून कौतुक होतं. नुसतं कौतुकच नव्हे तर, ती आमचा आदर करायची.

‘‘बाळ, काही सुचतंय का?’’ दीदीनंम कंटाळून विचारलं.

‘‘दीदी, आपण ताजमहाल बघायला जाऊ या...’’ उषाताईतला चित्रकार उत्साहानं म्हणाला.

‘जाऊ या; पण...’’

‘‘दीदी! पण, पण काय करतेस? ताजमहाल आग्र्याला आहे.

आपण आग्र्याला जाऊ या...’’

इतिहासाचा अभ्यासक असल्याच्या आविर्भावात मी म्हणालो.

‘‘बाळ, ‘ताज कोल्हापूरला आहे,’ असं मी म्हणणार होते काय?

अरे कसं जायचं? कोण व्यवस्था करणार? असं मला म्हणायचं होतं...’’, दीदी हसून म्हणाली.

सारे विचारात पडले. मग दीदीचे सचिव दांडेकर यांनी सारी व्यवस्था करून दिली आणि आम्ही आग्रामुक्कामी पोहोचलो. आम्ही आग्र्याला आलो आणि मनावरचा ताण कमी झाला. कारण, हॅाटेलमालक दीदीचा खास चाहता निघाला. त्यानं दीदीला फार छान सुइट दिला. उषाताईला तो दुसरी खोली देत होता;पण दीदीनं त्याला थांबवलं. नम्रपणे ती म्हणाली :‘‘देखिए जनाब, आप का सुइट तो बहुत बडा है. मैं अकेली रहकर क्या करूँगी? और आप का भी ये धंधे का सीझन है. हम इस सुइट में आराम से रहेंगे...’’

मालक अदबीनं म्हणाला : ‘‘अच्छा...आप की जैसी मर्जी...मैं कुछ नही कहूँगा. भाईसाहब (मी) के लिये बहुत अच्छी रूम देता हूँ. चलिए जनाब...’’

दीदी एकदम घाईघाईनं म्हणाली : ‘‘ये क्या बात कर रहे है आप? हम भाई-बहन साथ रहेंगे. और सुइट मे रहना कहाँ है? हम ताज देखने आये है. सुइट में तो सोने ही आयेंगे. और ये (मी) अभी छोटा है, अकेले डर जायेगा...’’ मालकानं एकदा माझ्याकडं पाहिलं.

हसून दीदीला म्हणाला :‘‘आप भी खूब मजाक करती हो! ये (मी) तो मुझ से बडे लगते है...माशाल्ला, अच्छी तबीयत पाई है. मैं इन्हे अच्छा कमरा देता हूँ...भाईसाब चलिए.’’

‘‘रूम कैसी लगी जनाब?’’

‘‘बहोत अच्छी रूम है आप की,’’ मी खूश होऊन म्हणालो. मला आनंद झाला. पु. ना. ओक यांचं ‘ताजमहाल नव्हे, तेजोमहालय’ हे पुस्तकही मी माझ्याबरोबर घेऊन गेलो होतो.

मी एकदा इंदूरला मावशीकडं गेलो होतो तेव्हाची गोष्ट. तिनं फार कौतुकानं मला ‘मांडू कीला’ दाखवला. हा ‘मांडू’ म्हणजे ‘मांडवगड’. गाईड मोठ्या कौतुकानं बादशहाचं कौतुक सांगत होता : ‘क्षिप्रा नदी दिसावी म्हणून त्यानं हा उंच महाल कसा बांधला, किती खर्च आला, किती मजूर मृत्युमुखी पडले’ वगैरे.

मी कंटाळलो होतो.

‘मांडू इथे मांड राग तयार झाला...’, ‘क्षिप्रा नदी बघून मेघमल्हार तयार झाला...’ गाईड धडाधड खोटं बोलत होता.

महाल छान होता. मी तिथंच रेंगाळलो.

गाईड आणि प्रेक्षक पुढं गेले. पुढं जाऊन मला ‘रागांची उत्पत्ती’ यावर

गाईडचं भाषण ऐकायचं नव्हतं. मी त्या महालाला फेरी मारायला सुरुवात केली. एके ठिकाणी मला काहीतरी ओळखीचं वाटलं.

मी थांबलो...भिंतीजवळ गेलो. लक्षपूर्वक पाहिलं. राधा-कृष्ण, सीता-राम, गणपती या देवतांच्या सुबक मूर्ती उलट्या करून त्यांना चुना-गिलावा लावून ती सुबक भिंत बांधली गेली होती.

थोडासा चुना निघाला होता म्हणून मूर्ती स्पष्ट दिसत होत्या.

लहानशा तुकड्यांऐवजी, दगडांऐवजी मूर्ती?

रोज मंडूला येऊन ‘दाल-बाटी’चं जेवण करणाऱ्या असंख्य हिंदूंना या उलट्या, चेंदलेल्या मूर्ती दिसल्या नसतील काय?

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर म्हणाले होते :‘‘मी इंग्रजांना, मुस्लिमांना

कधीच घाबरलो नाही; पण मी हिंदूंना मात्र घाबरतो.’’

मी खोलीत गेलो आणि ‘ताजमहाल नव्हे, तेजोमहालय’ हे पुस्तक चाळत बसलो. प्रथम माझं लक्ष वेधून घेतलं ते औरंगजेबाच्या पत्रानं.

हे पत्र तीन बखरींत आहे...म्हणजे सत्य आहे.

इथं संक्षिप्त रूपात देत आहे :

‘‘मी अकबराबाद (आग्रा) गुरुवार मोहरम महिन्याच्या तृतीयेस पोहोचलो. बादशाहजादा जहाबानी (दारा सिकोह)

यांची भेट जहाँआरा उद्यानात घेतली. माझा मुक्काम माहताबखाँ महालात होता; जिथं आपल्या आदेशानं दफनविधी झाला होता. तिथली विविध स्तरांवरील थडगी सुरक्षित असली तरी घुमट गळतो आहे....साऱ्या परिसरातल्या खोल्या, इमारती गळत आहेत...त्यांची डागडुजी केली पाहिजे...घुमट, जमातखाना इमारतीची पावसाळ्यात वाईट स्थिती होईल. दुरुस्तीचं काम लवकर हाती घ्यावं.’

हे पत्र अस्सल आहे. यात ‘ताजमहाल’ हा शब्द कुठंही येत नाही.

औरंगजेबाला खरं नाव माहीतच नाही. म्हणून तो फक्त इमारत, जमातखाना वगैरे उल्लेख करतो.

औरंगजेब सन १६५२ च्या पावसाळ्यात खडकीला (औरंगाबाद) प्रस्थान करतो.‘सन १६३१ ते १६५३ दरम्यान ताजमहाल नवीन बांधला,’ असं शिलालेखांवर लिहिलं आहे. हे जर खरं असेल तर, १६५२ मध्ये ‘सर्व इमारती जीर्ण होऊन गळत आहेत...त्यांची पक्की दुरुस्ती करणं आवश्यकच आहे,’ असा उल्लेख औरंगजेबाच्या पत्रात आलाच नसता.

‘ताजमहाल शहाजहाननं बांधला’ असा उल्लेख बादशहाच्या कागदपत्रांत, बखरीत असायला हवा; पण असा उल्लेख कुठंही नाही.

कारण, ताजमहाल शहाजहाननं बांधलाच नाही. शहाजहानच्या ‘बादशाहनामा’मधला उल्लेख पाहू :

‘शुक्रवार, १५ जमादुल अव्वल या दिवशी स्वर्गस्थ मुमताज उल् झमानीचा मृतदेह - जो काही काळ जमिनीत (बुऱ्हाणपूर) पुरला होता -तो जमिनीतून उकरून त्याची प्रेतयात्रा सुरू झाली. महंमद शहासूजा

बहादूर वजीरखान व मृत राणीचं मनोगत जाणणारी दासी सातुन्निसा खानम यांच्यासह राणीचा तो मृतदेह अकबराबाद (आग्रा) नगरात पोहोचला. मुमताजला पुरण्यासाठी जे स्थान निश्चित करण्यात आलं होतं ते नगराच्या दक्षिण भागातलं एक विस्तीर्ण, सुंदर उद्यान होतं.

त्या उद्यानात ‘मानसिंहमहाल’ नावाचा एक राजवाडा होता.

मानसिंहाचा नातू जयसिंह याच्या मालकीचा तो राजवाडा आहे.

मुमताजला तिथं पुरण्याचं ठरवलं गेलं. जयसिंहला त्या पैतृक महालाचं फार प्रेम होतं; पण शहाजहानची गरज म्हणून तो राजपरिसर शहाजहानला निःशुल्क द्यायला तो तयार झाला असता. मात्र, बादशहानं दुःखद प्रसंग म्हणून जयसिंहाला थोडी शाही जमीन दिली. पुढच्या वर्षी मृतदेह पुरण्यात आला. अद्वितीय सौंदर्याच्या त्या घुमटाच्छादित गगनचुंबी इमारतीत मृतदेह पुरला. त्या इमारतीची भव्यता शाहजहानच्या साम्राज्यशक्तीची द्योतक आहे. उत्तम कारागिरांच्या साह्यानं मृतदेह पुरण्यात आला. खर्च चाळीस लाख रुपये आला. मुमताजचा मृतदेह पुरण्यात आलेल्या जमिनीस ‘सब्ज जमीन’, म्हणजे हिरवीगार जमीन, असं म्हटलं जातं. म्हणजे, उद्यान व त्यावरील इमारत-ए-आलिशान वा गुंबज-ए-मंझिल...राजा मानसिंह याचा अद्वितीय सौंदर्याचा घुमटाच्छादित राजवाडा म्हणवल्या जाणाऱ्या इमारतीत मुमताजचा मृतदेह पुरला, असं स्पष्ट विधान आहे.

छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्म झाल्यानंतर एक-दीड वर्षात (सन १६३१) तो ताजमहाल शहाजहाननं बळकावला. तरी बागेबाहेरच्या इमारती व भोवतालचा परिसर जयसिंहाच्या ताब्यात राहिला. ३५ वर्षांनंतर (१६६६) १२ मे ते १६ ऑगस्ट १६६६ या काळात छत्रपती शिवाजीमहाराजांचं वास्तव्य ताजमहालाच्या कोटाबाहेरच्या बागेत होतं.

‘मुमताजच्या कबरीवर शहाजहानचे अश्रू अजूनही गळतात’ अशी अफवा पसरवण्यात आली आहे; पण त्यामागं एक हिंदुस्थानी ऐतिहासिक सत्य दडलेलं आहे. तेजोमहालाच्या दोन मध्यवर्ती कक्षांत जी शिवलिंगं होती, त्यांवर साखळदंडानं एकेक घट टांगलेला असे. ते घट सोन्याचे-चांदीचे असत. ती लोखंडी साखळी अजूनही मुमताजच्या कबरीवर लटकत्या स्थितीत आहे. सर्व पुरावे बघता,‘ताजमहाल नव्हे, तेजोमहालय’ हेच खरं. पु. ना. ओक यांनी चुकीच्या रूढ समजुतीवरचा पडदा बाजूला करून ताजमहाल हा मुळात ‘तेजोमहालय’ नावाचा राजवाडाच असल्याचं सत्य सन १९५६ मध्ये समोर आणून सर्व नेत्यांना व इतिहासकारांना जाब विचारण्याचं धैर्य दाखवलं.

‘‘बाळ, ऊठ, आठ वाजलेत...दहा वाजता ताज बघायला जायचं आहे. हॅाटेलमालकानं एक प्रसिद्ध गाईड दिला आहे. चल ऊठ, आपल्याला चालतच जायचं आहे. रस्ता जुनाच आहे. चल, आंघोळ कर...’’

आम्ही गाईडसह ताजमहाल बघायला निघालो. दहा मिनिटांच्या अंतरावर ताजमहाल होता. रस्ता दुकानांनी भरला होता.

गाईड दीदीला प्रभावित करण्यासाठी नुसता बडबडत होता. पाच मिनिटांत सर्व कंटाळले.

‘‘बाळ, इकडं ये. या गाईडला मराठी कळतं का?’’

‘‘अगदी नाही. तू कोल्हापुरी शिव्या घातल्यास तरीही त्याला ती तारीफच वाटेल,’’ मी ठोकून दिली.

‘‘अरे! हा आत्ताच इतका छळतो आहे, तर ताज बघितल्यावर हा चेकाळेलच. ही पीडा काहीही करून घालव,’’ दीदी गयावया करून म्हणाली.

‘‘क्या कह रही है आप? कुछ चाहिये तो बंदे को हुक्म दीजिये...’’ गाईड खास मुसलमानी अदबमध्ये म्हणाला.

‘‘कुछ नही. मैं कह रही थी के, ये गाईडसाहब उर्दू के अल्लामा है. इन से कुछ सीख लो,’’ दीदी माझ्याकडं पाहत हसत म्हणाली

‘‘मैं और अल्लामा? ये तो आप की जर्रानवाजी है. नाचीज तो आम गाईड है. लेकिन जब ताज आयेगा तब आप नाचीज की जुबाँ सुनीए, ताज देखना भूल जायेंगी आप.’’

‘‘दीदी को आप की भाषा अच्छी लगती है. ताज में इनकी पीठ मत छोडिएगा,’’ दीदीकडं बघत मी गंभीरपणे म्हणालो.

तेवढ्यात ताजच्या प्रचंड दारात आम्ही पोहोचलो.

ताजमहालाच्या प्रथमदर्शनानं माणूस स्तब्ध होतो. हरपून जातो; पण आज ताजमहालच मुग्ध झाला. हरपला. स्तब्ध झाला.

दीदी स्थापत्यशास्त्रातलं जगातलं एक आश्चर्य बघत होती.

आणि, ताजमहालही संगीतातलं एक आश्चर्य बघत होता.

संत ज्ञानेश्वरमहाराज ‘चांगदेवपासष्टी’मध्ये लिहितात : ‘चांगदेवा, तू एक डोळस ऐना आहेस...मीही एक डोळस दर्पण आहे...आपल्या दोघांमध्ये आत्मरूप उभं आहे...किती बिंबांची गणती करणार?’

ताजमहालाच्या परिसरात दोन डोळस आश्चर्ये एकमेकांसमोर उभी होती.

किती आश्चर्यांचा, काय हिशेब करणार? दीदी आणि मी त्या प्रचंड दारात आलो. आणि, अगदी सहजपणे समोर पाहिलं. ते प्रतिभावंतांचं ‘स्वप्न’ आमच्यासमोर उभं ठाकलं होतं. संगमरवरी पर्वताच्या अतिसुंदर हृदयाचं, शुभ्र, प्रकाशस्थ, उषःकालीन ‘गीत’ आमच्यासमोर उभं ठाकलं होतं.

सृष्टिदेवतेच्या गळ्यातल्या मोत्यांचा हार तुटून एकच ‘पाणीदार मोती’आमच्यासमोर घरंगळत आला होता की धरतीच्या हृदयस्थ तानपुऱ्याचा ‘गंधार’ पाषाणातून उमटला होता?

की आकाशातून झरणाऱ्या पर्जन्याच्या पहिल्या सरीचा प्रथम थेंब साकळला होता?

की पर्णांवरून घरंगळून पाकळीवर स्थिरावलेला, किरणांनी तेजोमय केलेला ‘दवाचा थेंब’ थरथरत होता?

की विश्वसागराच्या उदरातल्या शिंपलीतला घराणेदार ‘मोती’ सजला होता?

की आकाशस्थ विद्युल्लतेचा प्रकाशझोत ‘आकार’ घेऊन उभा होता?

की सुंदर तर्जनीवरच्या एका आशयघन मुंदरीतला तेजस ‘हिरा’ तेजपुंजाळत होता?

की एका सुंदर तरुणीचे आव्हानत्मक ‘हास्य’ स्वरलहरीत रूपांतरित झालं होतं?

की साहित्यमहासागरावर उमटणारे ‘काव्यतरंग’ अक्षय झाले होते?

की विश्ववीणेचा गगनभेदी ‘षड्ज’ झंकार छननन् करतोय?

की प्रभू रामाच्या पदस्पर्शानं शिळामुक्त झालेली अहल्याच ‘उभी’ होती?

की तो अशोकवनातल्या सीतेचा अनाथ ‘अश्रू’?

की ‘मोगरा फुलला’मधला एक ‘मोगरा’ यमुनातीरी पडला होता?

की ते एका जुलमी बादशहाच्या खड्गाचं ‘पातं’ लखलखत होतं?

की ते शोषित कारागिरांच्या स्वेदाचं अन् रक्ताचं फसफशीत उडणारं ‘कारंजं होतं?

‘इक शहनशाह ने हम गरिबों का उडाया है मजाक...हा मजाक ‘मजार’ बनून उभा होता. तो ताजमहाल होता. ताजमहाल मात्र स्तब्ध आहे. एक पाय भूतकाळात, एक पाय भविष्यात रोवून वर्तमानात ताज उभा आहे. तो शुभ्रधवल तेज सांडत उभा आहे.

जाऊ द्या !

बहुतेक आमिर खाँसाहेबांचा हा ‘खयाल’ असावा...किंवा, बडे गुलाम अली खाँ यांची ‘मैफल’ असावी...दीनानाथांच्या नाट्यसंगीतातली तानेची ‘फेक’ असावी...अथवा गालिबची ‘गझल’ सरळ उभी असावी...किंवा मदनमोहनची ‘लग जा गले...’ची असहाय्य ‘मुलाकात’ असावी. नाही...! हा लताच्या कंठातला ‘दर्द’ तर उभा नाही?

आम्ही संमोहित होऊन पहिली पायरी बागेत जाण्यासाठी उतरलो.

गाईड एकदम ओरडला : ‘मोहतरमा! ये है वो ऽऽ दुनिया की सब से खूबसूरत इमारत...माहताब का टुकडा, प्यार की दास्ताँ ऽऽ दिलकश. खूबसूरत ताऽऽजमहाऽऽऽल...’

आम्ही सारे दचकलो. हीच ताजमहालाची खुबी आहे. त्याच्या सौंदर्यात तुम्ही इतके एकाकार होता की कुठल्याही आवाजानं तुम्ही एकदम दचकता. दीदीनं रागानं त्याच्याकडं पाहिलं. कारण, तिची समाधी या गाईडमुळं भंग पावली होती. मग लटके हसत ती तोंडातल्या तोंडात म्हणाली : ‘‘ये ताजमहल है? मैं ने तो सुना था कि वो एक मजार है, कब्र है...ये तो किसी राजा का राजमहाल लगता है.’’

‘‘आप भी खूब मजाक करती हो. पूरी दुनिया इसे ताजमहल के नाम से जानती है और आप इसे राजमहल कहती हो...’’

‘‘देखिए, मैं मजाक नही करती. मगर आप हर कदम पे ताजमहल के

बारे में कुछ कहोगे तो वो मुझे झोंपडे जैसा लगेगा,’’ दीदी गंभीरपणे म्हणाली.

आपण कमी बोललं पाहिजे हे गाईडच्या लक्षात आलं.

तरी तो खवचटपणे म्हणालाच : ‘‘अच्छा...चलिए, दुनिया का

सब से खूबसूरत झोंपडा देखने चलिए...’’

दीदी शांतपणे म्हणाली : गाईडसाहब, आप टपरी को झोंपडा कहते हो?’’

आता गाईड गोंधळला. चाचरत म्हणाला : ‘‘ये टपरी क्या होती है?’’

‘‘मेरा सर,’’ दीदी हसत म्हणाली,

‘‘चलिए, इस बाग से चलिए...’’

गाईड गोंधळून म्हणाला आणि मग गप्प झाला.

आम्ही कारंज्याच्या बाजूनं चालू लागलो.

हवा फार छान पडली होती. वातावरण उबदार होतं.

सर्व जुन्या कागदपत्रांत ताजच्या परिसराला ‘सब्ज जमीन’ असा शब्द

वापरला गेला आहे. म्हणजे, हिरवीगार जमीन. झाडां-फुलांनी बहरलेली, हरिततृणानं झाकलेली. औरंगजेब असा उल्लेख करतो. अनेक परदेशी प्रवासी असाच उल्लेख करतात.

छत्रपती शिवाजीमहाराजांना कैदेत (१२ मे ते १६ ऑगस्ट १६६६) ठेवलेली जागा ताजमहालाच्या, रामसिंहाच्या बागेत - म्हणजे महालात - होती. ते सर्व सैनिक, मावळे ‘सब्ज जमीन’ असाच उल्लेख करतात.

आम्ही या ‘सब्ज जमिनी’वरून चालत होतो. मागं प्रचंड तट होता. कमीत कमी एक हजार सैनिक राहतील अशा कोठ्या बांधलेल्या

होत्या. बाजूला कारंजं उडत होतं. जमीन बांधलेली. अगदी उत्तम. जयपूरच्या लालमहालातल्या जमिनीसारखी लाल. खरं म्हणजे, आग्रा या शहराचं मूळ नाव याम्य होतं. दुसरं एक नाव यमप्रस्थ होतं. एक नाव अग्रनगर होतं. मुघलांनी ‘अकबराबाद’ असं मोठं नाव दिलं. शहाजहान, औरंगजेब, जहाँआरा, दारा शुकोह हे सर्वजण सरदार अकबराबाद असाच उल्लेख करतात.

डाव्या हाताला एक जयपुरी पद्धतीची इमारत दिसते. तिला अजूनही ‘सहेलियों के बुरुज’ हे राजस्थानी नाव आहे. आम्ही जसजसे ताजमहालाच्या जवळ जाऊ लागलो तसतसं त्याचं सौंदर्य वाढू लागलं. त्याचा सतेज रंग चक्क तेज वाहू लागला. त्याच्या भव्यतेनं छाती दडपू लागली. सगळे विचार, श्रम संपले. फक्त ताजचं सौंदर्य सगळीकडं व्यापून राहिलं.

बडबड्या गाईडही शांत झाला.

दीदी अचानक म्हणाली : ‘‘बाळ, इथंच थोडा वेळ बसू या. छान हिरवळ आहे, हॅाटेलमालकानं चांगले पदार्थ नाश्त्यासाठी बांधून दिले आहेत. मघाशी आपण ताज लांबून पाहिला. आता जवळून पाहू या. एकदा आत गेलो की सारं सौंदर्य नष्ट होईल.’’

‘‘का दीदी? सौंदर्य का नष्ट होईल? उलट, सौंदर्याचं मर्म आपण जवळून पाहू,’’ उषाताई उसळून म्हणाली. कारण, तिच्यातला चित्रकार जागृत झाला होता.

‘‘उषा, एवढी उसळू नकोस. मला माहीत आहे, तू उत्तम चित्रकार आहेस, ताजच्या सौंदर्याचं तूच चांगलं रसग्रहण करू शकशील; पण तू रसग्रहण करताना, सौंदर्यविवेचन करताना तुझे विचार शब्दांत मांडू शकशील? पण तूच सांग, या ताजचा प्रत्येक संगमरवर अपूर्व आहे. पहाडातून तोडलेला हा दगड...आपल्यामध्ये लपलेलं आगळेपण शोधून, स्वतःलाच सोलीव करतो. फळाचं कवच किंवा साल सोलली की जसं माधुर्य प्रकट होतं, त्याप्रमाणे संगमरवरानं सौंदर्याचा शोध घेत टाक्याचे घाव सहन करत करत स्वतःलाच सोलीव करून आत लपलेलं सौंदर्य प्रकट केलं आहे. स्वतःलाच वेदनांचं दान दिलं आहे. या सोलीव, रक्तबंबाळ संगमरवरानं पाषाणाचं कठोरपण फोडून दगडाला मृदू केलं आहे. हे ‘पाषाणहौतात्म्य’ तू शब्दबद्ध करू शकशील? हे दान शब्दांत मांडू शकशील? मला नाही वाटत! शब्द हे प्रत्यक्ष संवेदना होऊच शकत नाहीत. सौंदर्याचे ते आधार होऊ शकतात; पण जन्मदाते होऊ शकत नाहीत. रसग्रहण मन करतही असेल...सौंदर्याचा गाभाही त्याला गवसत असेल; पण व्यक्त होणारं जे सौंदर्य शब्दातीत आहे, त्याचं वर्णन कसं करणार?

मी मघाशी म्हणाले : ‘ताज लांबून पाहिला...जवळूनही पाहतोय,’

मात्र, आता एकदा आत गेलो की सारं सौंदर्य नष्ट होणार...कारण, आपण ताजमध्ये प्रवेश केला की आपण ताज होणार! आपलं अस्तित्व ताजच्या सौंदर्यात एकाकार होणार. लवण जसं समुद्रात आपलं अस्तित्व विसरतं तसं आपलं सौंदर्यासक्त हृदय, मन या सौंदर्यात प्रवेश करताच तिथंच विसर्जित होईल. तुझे रंग कागदावर कसे विसर्जित होतात, शब्द कवनात कसे विरून जातात, हृदयातून मारलेली हाक कशी ज्ञात्याच्या मनात विसर्जित होते...तसं आपलं सौंदर्यासक्त मन ताजच्या सौंदर्य-अस्तित्वाला सुगंधासारखं लगटेल...लगटून, लगटून जिरेल, विरेल.’’

‘‘हे स्वरमाउली, तू इतकी उदास का झाली आहेस?’’ मी हसत विचारलं.

‘‘दीदी, ताज बघून लोक आनंदी होतात...प्रेमी मजनू नव्यानं प्रेम करू लागतात. कारण, एका बादशहानं आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ हा ताजमहाल बांधला आहे.’’

‘‘बाळ, माझी टिंगल करतो आहेस काय? पण गमतीत का असेना; तू मला ‘स्वरमाउली’ म्हणालास, त्यामुळं ज्ञानेश्वरमाउलींची आठवण आली, म्हणजेच, आपल्या प्रिय देशाची - महाराष्ट्राची - आठवण आली. काहीही म्हण; पण

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

बकुळफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा

ती शांत निजे, बारा मावळ पेठ

शिवनेरी जुन्नर थेट

त्या निजल्या तशाच घाटाखाली

कोकणच्या चवदा ताली...

बाळ, आपला देश फार चांगला आहे. छत्रपतींनी अस्मिता जागृत केलेला देश आपला....पण मी उदास का झाले? कारण, सौंदर्य बघून मन आनंदित होतं; पण सौंदर्याचं मूर्त रूप बघून मन उदास होतं. मोठी कला, अमूर्त कला, उत्कट कला मन उदास करतात. आनंद समाप्तीची पूर्तता करू शकत नाही. शोकान्तिका समाप्तीची पूर्तता करतात. म्हणजे, आनंद फार वेळ मन व्यापू शकत नाही. शोकान्तिका मात्र मनात रेंगाळत राहतात. महाभारतातला अर्जुन फार काळ मनात राहू शकत नाही; पण अपयशी कर्ण मात्र मन व्यापून राहतो. तसं ताजच्या सौंदर्यात कुठं तरी दुःख लपलेलं आहे. ते मनाला व्यापून राहतं. बरं, आता आपण जिना चढून ताजच्या मनात शिरू या...’’

‘‘दीदी, क्षमा कर...पण तू ‘ताजमहाल’ या कबरीमध्ये प्रवेश करणार नसून, तू मानसिंहाच्या तेजोमहालय’ या हिंदू वास्तूमध्ये प्रवेश करणार आहेस...’’

दीदी शांतपणे हसली. म्हणाली : ‘‘मला ताजमहालामध्ये काहीही रस नाही. आणि, तेजोमहालय या वास्तूमध्येही रस नाही. मला रस आहे तो त्या कारागिरांच्या प्रतिभेत. त्यांच्या निर्मितिक्षमतेत, त्यांच्या अभिव्यक्तीत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.