मंदिरांची शैली आणि स्वरूप...
esakal September 22, 2024 09:45 AM

- केतन पुरी

मंदिरांच्या स्थापत्यशास्त्र आणि शिल्पशास्त्राविषयीचे लेख वाचून मागील दोन महिन्यांपासून अनेक वाचकांकडून मंदिर कसं पाहावं, हा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला. मंदिर हा भारतीय स्थापत्य शास्त्रामधील एक महत्त्वाचा घटक आहे.

लेणी, मंदिरे, किल्ले, राजवाडे-वाडे अशा अनेक घटकांपैकी संख्येने सर्वांत जास्त असलेला घटक. मुख्यतः धार्मिक भावनेला केंद्रभागी ठेवून मंदिरांची निर्मिती केली जाते. या मंदिरांचे अनेक भाग आहेत. निरनिराळ्या कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या ग्रंथाच्या आधारे हे स्थापत्यशास्त्र विकसित होत गेले. यामध्ये समरांगण सूत्रधार, प्रासादमंडण, मनसार, वास्तुशास्त्र, अपराजितपृच्छा, देवतामूर्ति प्रकरण, रूपमंडण यांसारख्या शिल्पशास्त्र-स्थापत्यशास्त्रीय ग्रंथांचा समावेश होतो.

मंदिरांमध्ये अनेक भाग असतात. मंदिरात ज्या ठिकाणी देवतेच्या प्रतिमेची स्थापना केलेली असते ते गर्भगृह, त्यापुढं असणारा भाग म्हणजे अंतराळ, त्यापुढे असणारा मंडप हे भाग जवळपास सर्वच मंदिरांमध्ये असतात.

मंडपामध्ये प्रवेश करण्यासाठी अगदी समोरच्या बाजूला चौकोनी आकाराचा छोटा मंडप असतो, त्याला मुखमंडप असं म्हणतात. मंडपाच्या दोन्ही बाजूस म्हणजे मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या आणि उजव्या बाजूला दोन छोट्या मंडपांची योजना केलेली असते, त्यांना अर्धमंडप असं म्हणतात.

एखाद्या मंदिराला एक गर्भगृह असेल तर ते ‘एक कूट’, दोन असतील तर ‘द्विकूट’, तीन असतील तर ‘त्रिकूट’, चार असतील तर ‘चतुष्कूट’ आणि पाच असतील तर पंचकूट असे संबोधण्यात येते. चारपाच गर्भगृह असलेली मंदिरे जास्त प्रमाणात होयसळ राजांनी बांधलेल्या प्रदेशात आढळून येतात. मंदिराच्या गर्भगृहाला आतमधून प्रदक्षिणा मार्ग असतो, त्याला ‘सांधार’ असे म्हणतात तर मंदिराच्या बाहेरील बाजूस आपण प्रदक्षिणा मारतो त्यास ‘निरंधार’ असे संबोधण्यात येते. मंदिर जर एखाद्या उंच चौकोनी चबुतऱ्यावर उभारले असेल तर त्याला ‘जगती’ म्हणतात.

मंदिराच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत प्रत्येक भागास अनेक अनेक नावे देण्यात आली आहेत. त्यावर विविध देवतांच्या प्रतिमा निर्माण करण्यात येतात. या प्रतिमांच्या अभ्यासावरून कोणत्या देवतेला मंदिर समर्पित केलंय, कोणत्या विशिष्ट संप्रदायाचा मंदिरावर प्रभाव आहे यांसारख्या अनेक गोष्टी यातून समजून येतात.

विष्णुचे दशावतार, शिवाच्या संहार-अनुग्रह प्रकारातील प्रतिमा, अष्टदिक्पाल, नवग्रह, सप्तमातृका, ब्रह्म, गणेश, सूर्य आणि अशा कित्येक महत्त्वाच्या देवतांच्या प्रतिमांसोबतच सुरसुंदरी, यक्ष, गंधर्व, विद्याधर यांच्याही प्रतिमा मंदिरावर असतात.

मंदिराच्या बाह्यांगवर तसेच आतील बाजूस आपल्याला अनेक कामशिल्पे दिसून येतात. निर्मळ भावना मनात ठेवून मंदिरात प्रवेश करावा, हे सांगण्यासाठी या प्रतिमांची निर्मिती केली जाते असे सांगतात पण हेही चुकीचे आहे. अनेक तांत्रिक संप्रदायांचा मंदिरांवर असलेला प्रभाव या कामशिल्पांच्या माध्यमातून दर्शवण्यात येतो.

मंदिर कोणत्या शैलीचे आहे, हे ओळखण्यासाठी शिखर फार महत्त्वाची भूमिका बजावते. लतिन नागर, फांसना, शेखरी, भूमिज, द्रविड यांसारख्या अनेक शिखरांचे प्रकार मंदिरांचे वेगळेपण दाखवण्यास मदत करतात. महाराष्ट्रात सर्वांत जास्त प्रमाण आपल्याला भूमिज मंदिरांचे दिसून येते. द्रविड शिखराचे तीन उपप्रकार आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हेमाडपंती नामक कोणतीही शैली अस्तित्वात नाही. या प्रकारात निर्माण केलेले कोणतेही मंदिर नाही किंवा कोणत्याही स्थापत्यग्रंथामध्ये या प्रकाराविषयी काहीही माहिती मिळत नाही.

हेमाडपंती हा शब्द खरेतर मंदिर स्थापत्याच्या अभ्यासातून वगळण्यात यायला हवा. प्राचीन किंवा मध्ययुगीन काळात राजा हा केवळ शासनव्यवस्था सांभाळणारा किंवा एखाद्या राज्याचे निर्णायक निर्णय घेणारा व्यक्ती म्हणून अस्तित्वात नव्हता.

तर, सर्वसामान्य व्यक्ती आणि दैवी विश्व यांना जोडणारा एक प्रमुख घटक म्हणूनही कार्यरत होता. याच भावनेतून असंख्य मंदिरांची निर्मिती झाली. खास राजाच्या आदेशाने आणि आर्थिक साहाय्याने निर्माण झालेले राजमंदिर, ज्यांना सर्रासपणे ''रॉयल टेम्पल्स’ असे संबोधण्यात येते, हे याच भावनेतून निर्माण झाले असावेत असे अभ्यासक सांगतात. भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांची उभारणी थेट राजदानाच्या माध्यमातून करण्यात आली.

शैव आणि वैष्णव मंदिरांचे प्रमाण यामध्ये जास्त आहे. इतर संप्रदायांची सुद्धा मंदिरे आपल्याला दिसून येतात, पण त्यांचे प्रमाण फारसे नाही. धरणे, कालवे, शहरांची निर्मिती यांसारख्या गोष्टींसोबतच मंदिरांची निर्मिती करणे हेसुद्धा महत्त्वाचे काम समजून अनेक राजसत्तांनी त्यांची निर्मिती केली.

अनेक भव्य मंदिरांची निर्मिती व्यापारी, विशिष्ट संप्रदाय किंवा सामाजिक घटकांच्या सहयोगातून करण्यात आल्याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरांची निर्मिती होत असताना किंवा झाल्यानंतर मंदिरांची व्यवस्था सांभाळण्यासाठी अनेक दानांची योजना करण्यात येत असे. ते दान एखाद्या जमिनीच्या, गावाच्या, मौल्यवान रत्ने, सोने, चांदी आणि अशा अनेक मौल्यवान गोष्टींच्या स्वरूपात असे.

कर्नाटक येथील महाकूट नामक गावात असणाऱ्या महाकुटेश्वर मंदिराला सातव्या शतकात चालुक्य राजा मंगलेश याच्या पत्नीने मोती, हिरे, सोन्याचे छत्र आणि अनेक गावे दानस्वरूपात दिले असल्याची नोंद एका शिलालेखाच्या माध्यमातून मिळते.

एखाद्या राजसत्तेने दुसऱ्या राजावर आक्रमण केले आणि त्याचा पराजय केला तर राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांवर सुद्धा आपले शासन प्रस्थापित करणे आणि आपल्या धार्मिक मान्यतेनुसार मंदिरांच्या कित्येक गोष्टींमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचे पुरावे इतिहासात आपल्याला पाहावयास मिळतात.

एखाद्या संप्रदायाच्या वाढत्या प्रभावामुळे सुद्धा मंदिराच्या मूळ धार्मिक संकल्पनेत बदल करण्यात आले आहेत. शैव-वैष्णव मधील धार्मिक वाद तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अशाप्रकारच्या बदलाला ‘धार्मिक स्थित्यंतर’ म्हणून संबोधण्यात येते.

मंदिरे केवळ भक्तिभावाच्या किंवा धार्मिक भावनेच्या परिघात न बसवता त्यांच्यामागे असणारे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटक समजून घेणे आवश्यक आहे. एक मंदिर पाहताना आपल्याला एवढ्या सर्व घटकांचा विचार करावा लागतो. त्याशिवाय मंदिराच्या निर्मितीमागील मुख्य संकल्पना पूर्णपणे समजून येत नाही.

मागील काही लेखांमधून आपण पाहिलेल्या मंदिरांपैकी पट्टडकल येथील विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिर, वेरुळ येथील कैलास मंदिर, महाकूट येथील महाकुटेश्वर मंदिर, तंजावर आणि गंगाईकोंडचोळपुरम येथील दोन्ही बृहदेश्वर मंदिर, कैलासनाथ मंदिर कांचीपुरम, कोपेश्वर मंदिर खिद्रापूर ही काही महत्त्वाची उदाहरणे आपल्याला सांगता येतील. यातीलच एक महत्त्वाचा मंदिर समूह म्हणजे ‘खजुराहो’. त्याविषयी सविस्तर माहिती पाहू या पुढील भागात...

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.