हे गणराया, भक्तांना बुद्धी दे !
esakal September 22, 2024 09:45 AM

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

गणेशोत्सव नुकताच पार पडला. बहुतांशी मंडळांच्या मिरवणुका झाल्यात आचारसंहिता जोपासून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वरचे वर कमी होत चालली आहे. बुद्धीच्या देवतेचा उत्सव काही मंडळं लेझर शो, डी.जे, आणि नर्तिका नाचवून साजरा करण्यातच धन्यता मानत आहेत.

आपल्या उत्सवांना एक परंपरा आणि आचारसंहिता होती, आता ती पाळण्यात कोणालाच स्वारस्य नाही. कलात्मकतेच्या नावाखाली गणेशाच्या मूर्ती वाट्टेल तशा आकार देऊन आणि फ्युजन करून आपणच आपल्या बाप्पाची विटंबना करत आहोत, याचं भान कुणाला आहे ?

गणेशोत्सवाची निर्मितीच मुळात लोकांनी एकत्र येण्यासाठी झाली होती पण एकत्र येऊन नेमकं काय करायचं हा मात्र ज्याचा त्याचा विषय झाला. गावागावातील मंडळांमध्ये लागलेली स्पर्धा डॉल्बी आणि डीजेच्या पथ्यावर येऊन पडली. अमुक मंडळानं लाख रुपये खर्चून डॉल्बी लावला किंवा बँड लावले म्हणून तमुक मंडळानं दीड लाख रुपयांचा डीजे लावला. अमुक मंडळाने दोन लाख खर्चून नर्तिकेचा ऑर्केस्ट्रा आणला म्हणून मग तमुक मंडळानंही त्यांचीच री ओढत तसाच कार्यक्रम आयोजित करून शह देण्याचा प्रयत्न केला.

अरे, तुमच्या या ईर्षेत वर्गणी देणाऱ्या गोरगरीब लोकांचा आणि व्यापाऱ्यांचा पैसा असा नको तिथं उधळला जाऊ लागला तर त्यांचं दुःख कोण ऐकून घेणार? तुम्ही कितीही नाकारा पण गावगाड्यातले हे जळजळीत वास्तव आहे.

काही वर्षांपूर्वी बँड, डॉल्बी वगैरे क्वचित कुठंतरी दिसायचे. त्यामुळं गावातल्या युवकांना जल्लोष करण्यासाठी गणेशोत्सव हेच एकमेव हक्काचं व्यासपीठ असायचं.

वर्षाकाठी नाचून आनंद साजरा करण्यासाठी गणपती विसर्जन मिरवणूक म्हणजे प्रत्येकाच्या काळजातला विषय होता. अजूनही आहेच. मी लहान असताना आमच्या पेठेतील श्रीराम तरुण गणेश मंडळाच्या मिरवणुकीत लेझीम आणि झांजा खेळण्याच्या रंगीत तालमी दहा दिवस चालायच्या. शाळेतून आलं की हनुमान मंदिराकडं जायचं. मग सायंकाळी मंदिरातून तडमताशे, ढोल बाहेर निघायचे. त्या वाद्याच्या निनादात रोज दोनतीन तास खेळायचो. गल्लीतील मुले लेझीम खेळायची आणि मुली टिपऱ्या खेळायच्या. खूप सुंदर दिवस होते ते.

काळ बदलत गेला. मोबाइलच्या जमान्यात युवकांवर रिमिक्स आणि डॉल्बीचा संस्कार झाला. ढोलताशे, पिपाण्या, पेटी, संबळ, लेझीम, झांज, हलग्या या पारंपरिक वाद्यांवर नाचण्याचा त्यांना कमीपणा वाटू लागला. आता मुंबई-पुण्यातील चार भिंतींच्या आत असणाऱ्या डान्स बारचा आवाज आणि लेझर लायटिंग सर्रास मिरवणुकांत वापरली जाऊ लागली.

आधी ट्रॅक्टरच्या एका ट्रॉलीत बसणारे साउंड बॉक्स आता दहा टायरच्या ट्रकमध्ये चारपाच माळे करून वाजवले जाऊ लागले. धुंदीत नाचणाऱ्या युवा पिढीला आपण किती डेसिबल आवाजावर नाचतोय व त्यातून गावातील, गल्लीतील लहान लेकरांना, वृद्ध मंडळींना किती त्रास होत असेल याचं पुसटसंही भान नाही राहिले. बेभान होऊन ते ११० डेसिबल आवाजावर नाचतच राहतात.

डॉल्बीच्या आवाजानं युवकांचा मृत्यू झाला, अशा दुर्दैवी बातम्या वाचाव्या लागतात, तर आपणच आपल्या उत्सवाचे काय करून ठेवलं आहे याचा विचार व्हायला हवा. सध्या नर्तिकांच्या नाच-गाण्यांना होणारी गर्दी थक्क करणारी आहे. यात त्या नर्तिकांची चूक नाही त्यांना नाचण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी निमंत्रण देणारे दोषी आहेत.

अरे, जो कार्यक्रम चार भिंतींच्या आत फक्त प्रौढांनी पाहायचा असतो, तो तुम्ही ऑर्केस्ट्रा नामक बुरख्याखाली भर चौकात आणला. असे कार्यक्रम शाळकरी मुले सुद्धा आवडीने पाहायली आणि नर्तिकांचे बीभत्स गाण्यावरील अश्लील हावभाव पाहून जिभल्या चाटायला लागली. येणाऱ्या नव्या पिढीवर आम्ही काय संस्कार करत आहोत, याचा विचार कधी विचार केलाय का? उत्सव तर मनोरंजनासाठीच आहेत पण मनोरंजनाचे प्रकार सुद्धा वयोगटानुसार बदलतात हे आपण कधी समजून घेणार.

समाजात काही मंडळे अशीही आहेत, जी दहा दिवसांचा गणेशोत्सव समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करून साजरे करतात. ज्यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, व्याख्यान, शालेय स्पर्धा, शालेय साहित्य वाटप, स्त्रियांसाठी स्पर्धा, पालखी सोहळा, या माध्यमातून ते समाजात चांगला विचार पेरण्याचा प्रयत्न करतात. अशी सर्वच मंडळं कौतुकास पात्र आहेत.

अनेक वृत्तपत्रे, न्यूज चॅनल त्यांची दखल घेतात व त्यांचा सन्मानही करतात. हा प्रयत्न होणे काळाची गरज वाटतेय. हल्लीच्या बदलत चाललेल्या डॉल्बीमय उत्सवाच्या स्वरूपात ''विचारांचा गणेशोत्सव'' या माझ्या संकल्पनेतून गणेश मंडळांच्या सहकार्याने व्याख्याने देऊन सर्व महापुरुषांच्या चरित्रांसह, वाढती व्यसनाधीनता, महिला सुरक्षा, ग्रामविकास, स्त्री सबलीकरण, संस्कार आणि विद्यार्थ्यांचे करिअर हे विचार पेरू शकल्याचे समाधान आहे.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.