टिटेघर, नाटंबी येथील आंबेमोहोर पीक बहरले
esakal September 22, 2024 09:45 AM

महुडे, ता.२१ : भोर तालुक्यातील टिटेघर व नाटंबी परिसरात दहा एकर क्षेत्रावर पंधरा शेतकऱ्यांनी आंबेमोहोर वाणाच्या भात पिकाची लागवड केली होती. सध्या हे पीक जोमात बहरले आहे. कृषी विभागातर्फे प्रात्यक्षिक स्वरूपात सेंद्रिय पद्धतीने केलेल्या लागवडीची नुकतीच अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
भोर तालुक्यात आंबेमोहोर तांदळाची लागवड पूर्वी मोठ्याप्रमाणात केली जात होती. मात्र, अलीकडच्या काळात यामध्ये उताऱ्या अभावी मोठी झाली होती. सध्या या तांदळाला सर्वत्र मोठी मागणी असते याचा विचार करून महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या माध्यमातून आंबेमोहोर भाताचे क्षेत्र वाढावे यासाठी प्रात्यक्षिक स्वरूपात लागवड करण्यात आली होती.
आंबेमोहोरच्या उत्पादनात वाढ होऊन ग्राहकांना चांगल्या प्रतीचा तांदूळ उपलब्ध व्हावा यासाठी चालू खरीप हंगामात ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक संजय काचोळे व तालुका कृषी अधिकारी भोर रोहित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय पद्धतीने आंबेमोहोर भाताची प्रात्यक्षिके राबविताना शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उत्पादित आंबेमोहोर भाताला पुणे येथे बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात असल्याचे तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे यांनी सांगितले.

01101

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.