Noise Pollution : तरुणाईच्या तक्रारी! डॉक्टर, कानात शिट्टी वाजतेय...; साउंडच्या भिंतींमुळे कर्णबधिरतेची लक्षणे
esakal September 22, 2024 11:45 AM

- प्रज्वल रामटेके

पुणे - ‘डॉक्टर माझ्या कानात शिट्टी वाजल्याचा आवाज येतोय’, ‘मला ऐकायला कमी येतंय’, ‘कान दुखतोय, चक्कर येतेय’, अशा तक्रारी घेऊन तरुणाई फॅमिली डॉक्टरांसह कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे येत आहेत. यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीत कानठळ्या बसविणाऱ्या साउंडच्या भिंतींचा आणि ढोल-ताशांच्या आवाजाने उच्चांक गाठला. शिवाय अनेक मंडळांनी गुलालाची उधळण केली. त्यामुळे लहान मुले, तरुणांसह ज्येष्ठांना कानाच्या व श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे.

विसर्जन मिरवणुकीत दोन दिवस साउंडच्या भिंती आणि पारंपरिक वाद्यांचा आवाज शहरात प्रचंड घुमला. ९० पासून १०९.२ डेसिबल इतका प्रचंड होता. त्यात तरुणाईने मनसोक्त थिरकण्याचा अनुभव घेतला. आता त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत.

शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्ता या प्रमुख चार मार्गांवरून विसर्जन मिरवणुका निघाल्या. त्यात साउंडच्या उंच भिंती उभारल्या होत्या. त्याच्या कर्णकर्कश आवाजाने अनेकांना कानाचा त्रास होतो आहे. मंडळांवर कारवाई करण्यापेक्षा आधीच नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांसह आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी केली आहे.

‘कर्णबधिरता येण्याची शक्यता’

कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. नीलेश माडकीकर म्हणाले, ‘कानाच्या नसा नाजूक असतात. जेव्हा त्यावर आवाजाचे बम्बार्डिंग होते, तेव्हा कानातील ऐकू येणाऱ्या पेशींवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कानांच्या नसांचे काम कमी होते, त्याचा परिणाम म्हणून कानात शिट्टी वाजणे, कान दुखणे, ऐकू न येणे, असे त्रास होतात.

अशा रुग्णांना ऑडिओमेट्री तपासणी करून रक्तप्रवाह नॉर्मल होण्यासाठी औषधोपचाराने उपचार करता येतो. त्यासाठी डॉक्टरांकडे त्यांनी ४८ तासांच्या आत तपासणीसाठी यावे. याकडे दुर्लक्ष केल्यास कायमचे कर्णबधिरता येण्याची शक्यता नाकारता येत नाही.’

‘ज्या भागातून मिरवणुक निघते, त्याच भागात मी वास्तव्यास आहे. बुधवारी सकाळी जोरात साउंड सुरू झाला, तो साधारण दुपारी तीनपर्यंत सुरू होता. त्याचा मला प्रचंड त्रास झाला. डोकं दुखणे, मळमळ होणे यांसारखा त्रास होऊ लागला. त्यामुळे मला दोन दिवस कामावरून रजा घ्यावी लागली.’

- मयूर गायकवाड (नाव बदलले आहे)

‘गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझ्या रुग्णालयात अनेक तरुण मुले कानाची तक्रार घेऊन येत आहेत. त्यात कान दुखणे, ऐकायला कमी येणे, कानात शिट्टी वाजणे अशी लक्षणे होती. ही मुले मिरवणुकीमध्ये साउंडसमोर नाचली होती. बहुतेकांना कर्णनाद म्हणजे कानात शिट्टी वाजण्याचा त्रास होत आहे.’

- डॉ. नेत्रा पाठक, कान-नाक-घसा तज्ज्ञ

ही आहेत लक्षणे

  • कानात शिट्टी वाजल्याचा आवाज येणे

  • ऐकायला कमी येणे

  • कान सुन्न पडणे

  • कान दुखणे

माणूस किती आवाज सहन करतो?

1) सामान्य माणसाचे कान ७५ ते ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतात

2) गर्दीच्या ठिकाणी ११० डेसिबलपर्यंतचा आवाज आपण सहन करू शकतो

3) ११० डेसिबलच्या पुढे आवाजाची पातळी गेल्यास कानावर कळत न कळत परिणाम होतो

4) परिणामांचा विचार करूनच रहिवासी भागात आवाजाची मर्यादा दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल आहे

5) विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा १२० डेसिबलच्या पुढे जाताना दिसते

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.