भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांना 'प्रसाद'
esakal September 23, 2024 02:45 AM

पिंपरी, ता. २२ : नुकत्याच झालल्या गणेशोत्सव काळात ५३ नमुने घेतले. या कारवाईत जवळपास साडेचौदा लाखांचा भेसळीचा संशय असलेल्या पदार्थ जप्त करण्यात आला आहे. विविध उत्सवांच्या काळामध्ये खाद्यपदार्थांत मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. दरम्यान, यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे विभाग व जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ११७ ठिकाणांची तपासणी केली आहे.
गणेशोत्सव काळामध्ये विविध पथकांमार्फत तपासणी सुरू होती. पनीर, दूध, खवा, स्वीट मावा, बटर आणि तूप याची तपासणी केली. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये संशयावरून ४८ दुकानांची तपासणी करून ५३ अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कार्यालयाकडे काही तक्रार प्राप्त झाल्यानंतर छापे देखील टाकण्यात आले आहेत. याबाबतचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही त्रुटी आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. भेसळयुक्त गाईचे तूप आणि बटर जप्त करण्यात आले. यामध्ये पाच लाख १६ हजारांचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेमध्ये त्याचे नमुने पाठविण्यात आले असून, त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विविध तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यामध्ये पुणे विभाग आणि जिल्ह्यातील एकूण ११७ अन्नाचे नमुने घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मिठाई दुकानदार आणि भेसळयुक्त तूप बनवणारे विक्रेते रडारवर होते. याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध भागातून नागरिकांनी काही तक्रारी देखील केल्या होत्या. त्याची शहानिशा करण्यासाठी नमुने घेण्यात आले आहेत. एकूण १०१ तपासणी करण्यात आल्या आहेत. संशयावरून काही दुकानदाराला ताकीद देखील दिली आहे. यामध्ये नऊ लाख १८ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

अधिकाऱ्यांकडून उत्सव काळात विविध ठिकाणी तपासणी केली जाते. दिवाळी, दसरा या पार्श्वभूमीवर देखील तपासणी मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. नागरिकांनी काही तक्रार असल्यास कार्यालयात संपर्क करावा.
- सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.