Duleep Trophy 2024 : मयंक अग्रवालच्या टीमने उंचावली दुलीप ट्रॉफी, ऋतुराजचा संघ उपविजेता
GH News September 23, 2024 05:05 AM

मयंक अग्रवाल याच्या नेतृत्वात इंडिया ए संघाने 132 धावांनी विजय मिळवत दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेवर नाव कोरलं आहे. इंडिया ए संघाने अंतिम सामन्यात ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील इंडिया सी संघाला पराभूत केलं. इंडिया ए साठी शाश्वत रावत याने उल्लेखनीय कामगिरी केली. शाश्वतने केलेल्या शतकी खेळीमुळे इंडिया ए ला विजय मिळवण्यात मदत झाली. इंडिया ए ने सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. इंडिया एच्या या विजयासह त्यांचे एकूण 12 गुण झाले. त्यामुळे इंडिया ए 3 सामन्यांनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 टीम ठरली आणि ट्रॉफीवर नाव कोरलं. तर इंडिया सी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.

‘इंडिया सी’ची निराशाजनक कामगिरी

इंडिया सी संघाला विजयासाठी शेवटच्या दिवशी 350 धावांची आवश्यकता होती. मात्र इंडिया सी संघाचा डाव हा 81.5 ओव्हरमध्ये 217 धावांवर आटोपला. प्रसिध कृष्णा याने 13.5 ओव्हरमध्ये 50 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेत निर्णायक भूमिका बजावली. चहापानावेळेस सामना रंगतदार स्थितीत होता. इंडिया सी संघाने 169 धावांवर 3 विकेट्स गमावले होते. साई सुदर्शन आणि ईशान किशन ही जोडी मैदानात होती. तर विजयासाठी 30 षटकांमध्ये 182 धावांची गरज होती. मात्र मुंबईकर तनुष कोटीयन याने त्याच्या कोट्यातील सलग 2 षटकांमध्ये 2 विकेट्स घेत सामना फिरवला. इशान किशन याला 17 धावांवर बाद केलं. तर त्यानंतर तनुषने अभिषेक पोरेल याला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर तनुषने पुलकित नारंग याला 6 धावांवर बाद केलं. त्याआधी आकिब खान याने कॅप्टन ऋतुराज गायकवाड याला 44 धावांवर बाद केलं. तर विजयकुमार वैशाख 17 धावा करुन माघारी परतला.

साई सुदर्शनची शतकी खेळी वाया

दरम्यान साई सुदर्शन याने एक बाजू लावून धरली आणि शतकी खेळी केली. मात्र त्याची शतकी खेळी व्यर्थ गेली. साईने 206 चेंडूमध्ये 12 चौकारांच्या मदतीने 111 धाव्या केल्या. मात्र साईला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. रजत पाटीदार आणि मानव सुथार या दोघांनी प्रत्येकी 7-7 धावा केल्या. तर तनुष कोटीयन आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी 3-3 विकेट्स मिळवल्या. आकिबने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शम्स मुलानी याने 1 विकेट घेतली.

सामन्याचा धावता आढावा

इंडिया ए ने 297 धावा केल्या. इंडिया सी ला प्रत्युत्तरात 234 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे इंडिया ए ला 63 धावांची निर्णायक आघाडी मिळाली. इंडिया ए कडून दुसऱ्या डावात रियान पराद याने 73 तर शाश्वत रावतने 53 धावांची खेळी केली. तर कुमार कुशाग्र याने 42 धावांची भर घातली. इंडिया ए ने दुसरा डाव हा 286 धावांवर घोषित केला.

इंडिया ए संघाचा दुलीप ट्रॉफी विजयानंतरचा जल्लोष

इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), प्रथम सिंग, तिलक वर्मा, रियान पराग, शाश्वत रावत, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटीयन, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि आकिब खान.

इंडिया सी प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, इशान किशन (विकेटकीपर), बाबा इंद्रजीथ, अभिषेक पोरेल, पुलकित नारंग, मानव सुथार, अंशुल कंबोज, विजयकुमार विशक आणि गौरव यादव.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.