Pakistan Cricket: पाकिस्तानला क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का! WTC मधील मालिका तोंडावर असताना मीडिया हक्कच कोणी खरेदी करेना
esakal September 23, 2024 06:45 AM

Pakistan Cricket Board: इंग्लंड संघ पुढच्या महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात इंग्लंडला पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र या मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला आहे. कारण या कसोटी मालिकेचे आंतरराष्ट्रीय प्रसारण हक्क विकलेच गेलेले नाहीत.

ही मालिका ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र अद्याप पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय प्रसारणकर्ता मिळालेले नाहीत. त्यामुळे आता अशी शक्यता आहे की पाकिस्तानच्या बाहेर या मालिकेचे प्रसारणच होणार नाही. यामुळे पाकिस्तानला मोठे आर्थिक नुकसानही होणार आहे.

India-Pakistan: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणार सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या? वाचा नेमकं प्रकरण

क्रिकेटपाकिस्तानने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय प्रसारणाच्या तीन वर्षांच्या करारासाठी २१ मिलियन डॉलरची मागणी केली होती. पण इतक्या किंमतीपर्यंत कोणीही बोली लावली नाही.

दोन पाकिस्तानी कंपन्यांकडून साधारण ४.१ मिलियन डॉलरची संयुक्त बोली पाकिस्तान क्रितकेट बोर्डाला मिळाली होती. तसेच विलो टीव्हीने २.१५ मिलियन डॉलरची ऑफर दिली होती. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या बोली स्विकारल्या नाहीत.

सर्वोच्च बोली स्पोर्ट्स फाईव्हने लावली होती. त्यांनी ७.८ मिलयन डॉलरची बोली लावलेली होती. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला इतक्या कमी किंमतीत हक्क विकायचे नसल्याने त्यांनी त्यासाठी नकार दिला. ब्रिटनमध्ये पाकिस्तान क्रिकेटचे प्रसारक स्काय स्पोर्ट्स होते, पण त्यांनी आता हक्क खरेदी करण्यास रस दाखवलेला नाही.

Pakistan Cricket: शाहिन आफ्रिदीला ट्वेंटी-२० कर्णधारपदावरून हटवणे हा अन्याय...; माजी खेळाडूला संताप अनावर

त्यातच संघाची होत असलेली खराब कामगिरी आणि त्यामुळे चाहत्यांनी पाठ फिरवल्याचाही यावर परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यामुळे प्रसारक कंपन्याही मोठी बोली लावण्यास तयार नसल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, पाकिस्तान आणि इंग्लंड संघात ७ ऑक्टोबर रोजी मुलतानला पहिला कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरपासून दुसरा कसोटी सामनाही मुलतानलाच होणार आहे. तिसरा कसोटी सामना २४ ऑक्टोबरपासून रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.