गुळुंचे येथे निर्भया पथकार्गंत विद्यार्थिनींना मार्गदर्शन
esakal September 23, 2024 08:45 AM

गुळुंचे, ता. २२ : राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलिस ठाणे व नीरा दुरक्षेत्रांतर्गत निर्भया पथकाच्या वतीने नीरा (ता. पुरंदर) येथील लीलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींना स्वसंरक्षण व वाहतुकीचे नियम याविषयीचे मार्गदर्शन केले.
बदलापूर (ता. ठाणे) येथे झालेल्या घटनेनंतर राज्यातील सर्व पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. शालेय विद्यार्थिनींमध्ये जागरूकता घडवून आणण्याच्या दृष्टीने कन्या विद्यालयात पीएसआय दीपाली पवार, हवालदार रेणुका पवार, हवालदार नीलेश करे, हवालदार संतोष मदने यांच्यामार्फत विद्यार्थिनींना प्रबोधनात्मक मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पॉक्सो कायदा तसेच त्या कायद्याअंतर्गत कोणते गुन्हे येतात, त्यावर कोणती शिक्षा होऊ शकते, तसेच समाजात वावरताना मुलींनी किती जागरूकपणे वावरावे, गुड टच व बॅड टच या विषयीचे मार्गदर्शन दीपाली पवार यांनी विद्यार्थिनींना केले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला नायकोडी यांनी निर्भया पथकातील सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले, तसेच अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांची शाळेमध्ये गरज असल्याचेही सांगितले. विद्यालयाच्या उपशिक्षिका सपना ओव्हाळ यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.