Digital Arrest : 'डिजिटल अरेस्ट'मुळे कोट्यवधींचा फटका
esakal September 23, 2024 10:45 AM

- शिरीष देशपांडे

सध्या सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याकडून गुन्हा घडला असून, त्यासाठी प्रत्यक्ष अटक न करता डिजिटल अटक करत आहोत, अशी धमकी देऊन कोट्यवधी रुपये लुबाडत आहेत.

अशा प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलवर अचानक एका अनोळखी क्रमांकावरून फोन येतो. पलिकडून बोलणारी व्यक्ती तुमच्या नावावर असलेल्या बँक खात्यातून अनेक बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत किंवा तुमच्या आधार क्रमांकाला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावरून धमकीचे फोन गेले आहेत किंवा सध्या तपास चालू असलेल्या प्रकरणात तुम्ही एका प्रसिद्ध राजकीय व्यक्तीबरोबर गैरव्यवहारात सहभागी असल्याचे आढळून आले आहे,

त्याच्या व्हिडीओ क्लिप्स आमच्याकडे आहेत किंवा तुमच्याविरुद्ध ड्रग तस्करी आणि मानवी तस्करीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी विविध कारणे सांगून सध्या कार्यरत असलेले पोलिस अधिकारी, सीबीआय अधिकारी यांचे बनावट ओळखपत्र पाठवते आणि चौकशीसाठी व्हिडीओ कॉल करत असल्याचे सांगते. त्या कॉलमध्ये आधार कार्ड,

पासपोर्ट नंबर असलेले वॉरंट दाखविले जाते. त्यानंतर तुमची चौकशी सुरू होईल, त्यामुळे तुम्ही खोली बाहेर जायचे नाही आणि खोलीतही कोणाला येऊ द्यायचे नाही; अन्यथा घरातील सर्वांनाच अटक करू, अशी धमकी देण्यात येते.

चौकशीचे नाटक काही तास किंवा काही दिवसही चालते. घाबरलेली माणसे आणखी घाबरतात आणि या प्रकारातून सुटका व्हावी म्हणून सायबर गुन्हेगार सांगतील त्या खात्यात लाखो रुपये भरतात. मात्र, थोडी सतर्कता व हिंमत दाखविल्यास यातून सुटका होऊ शकते.

सतर्कतेमुळे झाली सुटका

पुण्यातील एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला तुमच्या नावावर अनेक खाती उघडली गेली आहेत. त्यातून गैरव्यवहार झाले आहेत, असे सांगून घरातच २४ तास ‘डिजिटल ॲरेस्ट’ केले. मात्र, त्यांच्या पत्नीला संशय आला व तिने आपल्या मुलीला याची कल्पना दिली. मुलीने वडिलांना फोन केला, तेव्हा ते दबक्या आवाजात बोलत होते, त्यावरून तिने धोका असल्याचा अंदाज बांधला आणि आपल्या पतीसह (दोघेही ‘सकाळ’चे नियमित वाचक) ओळखीच्या पोलिस अधिकाऱ्याला सोबत घेऊन थेट त्या खोलीत प्रवेश केला.

खऱ्या पोलिस अधिकाऱ्याने तोतया अधिकाऱ्याला चेहरा दाखव, असा आग्रह केला. तेव्हा सायबर चोरट्यांनी पळ काढला.अशीच घटना पुण्यातील एका व्यावसायिकासोबत घडली. मात्र, पत्नीच्या सतर्कतेमुळे व मित्रांच्या सहकार्याने वेळीच त्यांची सुटका झाली.

ही खबरदारी घ्या...
  • असा कोणताही फोन आल्यावर घाबरून न जाता शांतपणे विचार करा आणि मगच पुढे बोला.

  • जग कितीही डिजिटल झाले असले, तरी घरातून बाहेर जाण्यास मनाई करणे, हे कोणत्याही कायद्यात नाही. त्यासाठी सरकारी यंत्रणेचे अधिकृत वॉरंट किंवा कोर्टाची ऑर्डर लागेल. फोन, स्काईप किंवा इतर माध्यमातून असे धमकावणे म्हणजे नक्कीच खोटे आहे, याची खूणगाठ बांधा.

  • संगणक मायाजालामुळे खोटे पोलिस ऑफिस किंवा सरकारी ऑफिस तयार करता येते, हे लक्षात ठेवा.

  • आपल्याकडून एखादा गुन्हा घडला असल्यास चौकशी, जामीन, न्यायालयात हजर होणे यासाठी कायदेशीर प्रक्रिया असते. आपल्याला वकील घेऊन बाजू मांडायची संधी मिळते.

  • अशा घटनांमध्ये (skype app) ‘स्काईप’ ॲप डाउनलोड करायला सांगितले जाते, ते अजिबात करू नका.

  • सायबर गुन्ह्याची तक्रार कधीही ‘इन व्हिडिओ’ होत नाही, तर ती अधिकृत वेबसाईटवर जाऊनच करावी लागते, हे लक्षात ठेवा.

  • असा फोन आल्यास प्रत्यक्ष पोलिस चौकीतच येण्याचा आग्रह धरावा आणि पत्ता घ्यावा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.