सेलो (शुक्रवारचा बंद भाव : रु. ८७५)
esakal September 23, 2024 12:45 PM

सेलो वर्ल्ड ही भारतातील एक आघाडीची ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९६२ मध्ये झाली. गेल्या अनेक दशकांत, कंपनीने घरगुती वस्तू, मोल्डेड फर्निचर, लेखन साधने आणि इतर संबंधित उत्पादनांमध्ये आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे. ‘सेलो’ हा ब्रँड भारतात अत्यंत विश्वसनीय मानला जातो.

कंपनीची उत्पादने देशभरात घराघरात पोहोचली आहेत. उत्पादनांमधील वैविध्य, प्रीमियम उत्पादने, मजबूत ब्रँड ओळख ही कंपनीची स्पर्धात्मक वैशिष्टे आहेत. उत्पादन श्रेणीतील विविधतेमुळे, ग्राहकांना एकाच ब्रँडमधून विविध गरजा पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होते.

गेल्या तिमाहीत या कंपनीने ५०१ कोटी रुपयांचा एकूण महसूल; तसेच ८९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीने आगामी काळात सुमारे १५ ते १७ टक्क्यांनी वार्षिक वाढ साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कंपनीच्या काच उत्पादन प्रकल्पाच्या विस्तारामुळे कार्यक्षमता सुधारेल; तसेच आगामी काळात प्रीमियम उत्पादनांची विक्रीदेखील वाढेल. या नव्या व्यवसायामुळे, ७५-८० कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे, असे कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक गौरव राठोड यांनी सांगितले. कंपनीचे इतर व्यवसायही वृद्धी करत आहेत.

मोल्डेड फर्निचर व्यवसायात सुमारे १५ टक्क्यांपेक्षा जास्त वृद्धी झाली आहे. प्रीमियम उत्पादनांची वाढ, मजबूत ब्रँड ओळख, काच उत्पादनाचा विस्तार यामुळे कंपनीच्या व्यवसायवृद्धीच्या शक्यता वाढल्या आहेत. दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची शक्यता व क्षमता लक्षात घेता जोखीम लक्षात घेऊन, गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीसाठी गुंतवणुकीचा जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर ः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.